बोरिवलीहून पश्चिम किनाऱ्यावरील गोराई, मनोरी येथे जाण्यासाठी खाडीचा सामना करावा लागतो. मुख्य भूमी ते गोराई यादरम्यान मानोरीची खाडी असून त्यावर कुठलाही पूल नाही. या स्थितीत बोरिवली ते गोराई व गोराई ते बोरिवलीदरम्यान चालणारी फेरी सेवा ही दैनंदिन प्रवास करणाऱ्या स्थानिकांसाठी एकमेव माध्यम आहे. अशातच बोरिवली दिशेकडील जेट्टी जुनी झाल्याने स्थानिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या जेट्टीवरील दिवे खराब झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी स्थानिकांना अत्यंत सावध होऊन यावरून पायी जात फेरी गाठावी लागते. प्रामुख्याने ओहोटीवेळी फेरीसाठीच्या बोटी बऱ्याच दूर उभ्या राहतात. त्यामुळे कमकुवत झालेल्या जेट्टीवरून रात्रीच्या अंधारात बोट गाठणे जिकीरीचे ठरत असल्याने या जेट्टीच्या दुरूस्तीची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक करीत आहेत.
नव्या जेट्टीसाठी महाराष्ट्र मॅरिटाइम बोर्डाने निविदा काढली आहे. या निविदेनुसार, संबंधित कंत्राटदाराला जवळपास ३० मीटर लांबीची नवीन जेट्टी सध्याच्या जेट्टीच्या उत्तरेकडे बांधायची आहे. जेट्टीच्या दोन्ही बाजूला जवळपास साडे पाच मीटरचा उतार असेल. एकूण ५८०.०४ चौरस मीटरची जेट्टी असेल. ९ कोटी ५९ लाख ६८ हजार ७७८ रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत. २८ डिसेंबर ही निविदा भरण्याची अखेरची तारिख आहे. याखेरीज प्रत्येकी २०० वॉट क्षमतेचे चार मोठे प्रकाशदिवे १२.५० मीटरच्या उंचीवर आणि ४५ वॉट क्षमतेचे १० पथदिवे सहा मीटरच्या उंचीवर उभे करायचे आहेत.
रो-रो सेवाही सुरू करता येणार
दरम्यान, ही जेट्टी फेरी बोटीखेरीज भविष्यातील रो-रो सेवेसाठीदेखील असेल. यासाठीच तेथे टर्मिनल इमारतही उभी होणार असून त्याचादेखील निविदेत समावेश आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News