• Sat. Sep 21st, 2024

श्रीसिद्धिविनायक मंदिराबाबत न्यासाकडून महत्त्वाचे निर्णय, परिसरातील वाहतूक मार्गातही बदल होणार

श्रीसिद्धिविनायक मंदिराबाबत न्यासाकडून महत्त्वाचे निर्णय, परिसरातील वाहतूक मार्गातही बदल होणार

मुंबई: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात भाविकांना लवकरच अधिक सहजपणे, शांततेत गणरायाचे दर्शन घेता येणार आहे. यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून रुग्णांना केल्या जाणाऱ्या आर्थिक साह्याचे निकष बदलण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णांना आजाराच्या प्रकारानुसार अधिक आर्थिक मदत मिळू शकेल, अशी माहिती न्यासाचे नवनियुक्त अध्यक्ष सदा सरवणकर यांनी ‘मटा’ला दिली.

सध्या प्रत्येक गरजू रुग्णाला न्यासाकडून एकरकमी २५ हजार रुपयांची वैद्यकीय मदत केली जाते. २००९ सालापासून ही रक्कम तेवढीच आहे. महागाई आणि वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता ही रक्कम ५० हजार केली जाणार आहे. ‘कर्करोगावरील उपचार तसेच विविध आजारांचे स्वरुप लक्षात घेता उपचारांसाठी अधिक मदतीची गरज भासू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संकल्पनेतून ही योजना पुढे आली असून गंभीर स्वरुपाच्या आजारांवरील उपचारांसाठी मदतीची रक्कम २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मंदिरच्या दानपेटीत येणारी रक्कम ही समाजाची आणि भाविकांची आहे. त्यामुळे ती सढळ हस्ते भाविकांच्या आरोग्यासाठी वापरणे आणि तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे’, असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले.

शिर्डी साई दर्शनाबाबत नवा नियम, न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला महत्त्वाचा निर्देश
गजाननाचे दर्शन घेताना कोणतीही धक्काबुक्की किंवा गोंधळ घडू नये यासाठीचा विशेष आराखडाही न्यासातर्फे आखण्यात येत आहे. मंदिर परिसरातील दोन्ही प्रवेशाच्या मार्गावर लवकरात लवकर सुसज्ज आणि रेखीव प्रवेशद्वार उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठीच्या निविदाही मंजूर झाल्या असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मंदिर ते दादर रेल्वेस्थानक आणि प्रभादेवी रेल्वेस्थानक अशी फिरती बेस्ट बससेवा लवकरच सुरू होणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने मंदिर परिसरातील वाहतूक मार्गातही काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहे.

भाविकांना सुरळीतपणे गणेशदर्शन घेता येईल यावर माझा भर आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना लवकरच पाहायला मिळतील. दर्शनासाठी कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी कडक नियोजन करण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात सर्वांना प्रसन्न वातावरणात दर्शन घेता यावे याला आम्ही प्राधान्य दिले आहे”, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed