विधान परिषदेत कोकण विभागातील नैना या प्रकल्पावर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान सामंत यांनी ही माहिती दिली. आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा मांडला होता. यावेळी जयंत पाटील यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. त्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा व ५० टक्के नोकऱ्या ह्या त्या परिसरातील नागरिकांना मिळाव्यात अशी मागणी यावेळी पाटील यांनी लावून धरली. या चर्चेत अनिकेत तटकरे, प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेत विविध प्रश्न मांडले तसेच सूचनासुद्धा दिल्या.
यावर उत्तर देताना सामंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेऊ, त्यासाठी विशेष बैठक किंवा जनसुनावणी घेऊ, असे आश्वासन दिले. रायगड मधील एमआयडीसी ही सर्वांत मोठी लँड बँक आहे. यात सेझ मधील ७५ टक्के जमीन ही खासगी आहे तर उर्वरित २५ टक्के जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन करुन घेतली आहे. खासगी जागांचे काय करायचे यावर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. मात्र ज्या जागा उद्योगांसाठी घेतल्या आणि त्यावर उद्योग आलेच नाहीत त्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली.
कोकणात सगळ्यात मोठे प्रशिक्षण केंद्र
करमोली येथे तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करून देशातील सर्वात मोठे आणि सर्व सुविधा युक्त कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही ही केंद्रे उभारली जातील, यात नागपूरचाही समावेश असल्याचे सामंतांनी स्पष्ट केले. तसेच १५ जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन बांधले जाणार असून त्यासाठी १५० कोटी रुपये दिले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.