नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस दलाला शिस्त लावण्याबरोबरच सर्व कामकाज ऑनलाइन करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी ‘सीसीटीएनएस’ कार्यप्रणालीतील कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने कामकाज ऑनलाइन करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सीसीटीएनएस यंत्रणेत एफआयआर नोंदणीपासून ते तपास, आरोपपत्र व संबंधित सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने हाताळण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेचे कामकाज ऑनलाइन केल्याने राज्यातील प्रत्येक पोलीस दलाला ‘सीसीटीएनएस’ कार्यप्रणालीत माहिती भरावी लागत आहे. यात एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, अटक आरोपी, मालमत्ता जप्त, आरोपपत्र, शिक्षा आणि अपील व इतर माहितीचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस दलाने यातील महत्त्वाचे फॉर्म १०० टक्के भरण्याबरोबरच ‘सीसीटीएनएस’ प्रणालीअंतर्गत असलेल्या सीआरआय, एमएसी, आसीजेसी, आयटीएसएसओ या महत्त्वाच्या पोर्टलचा सुयोग्य पद्धतीने वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता आल्याने वाहनचोरी संबंधित गुन्हे, आरोपींचा पूर्वइतिहास, महिला व बालकांसंबधी गुन्हे हाताळण्यास सुलभ होऊन त्याची तपासात व गुन्हे निकाली काढण्यास मदत होत आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडून दरमहा ‘सीसीटीएनएस’ची क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार डिसेंबर २०२२मध्ये जाहीर झालेल्या क्रमवारीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ३६व्या क्रमांकावर होते. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे तसेच सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार ‘सीसीटीएनएस’ कक्षाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा राऊत व त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ‘सीसीटीएनएस’ कामकाजात प्रथक क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले. या पथकाचे पोलीस दलाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.