उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगली येथील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आपल्याला राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : “राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजतीय प्रवासावरही भाष्य केलं. “मी माझ्या राजकारणाची सुरुवात 1998 पासून केली. मला 1998 साली माहिती देखील नव्हतं की, मी कुठल्या तरी एका मतदारसंघाचा आमदार होणार आहे, मी राज्याचा उद्योग मंत्री होणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखं उत्तुंग नेतृत्व मला आशीर्वाद द्यायला महाराष्ट्रात मिळणार आहे. हे मला 1998 सालामध्ये माहिती देखील नव्हतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना आपण आनंदाने सामोरं जायचं असतं”, असं उदय सामंत म्हणाले.
“अनेक कटू प्रसंग तुमच्यावरदेखील आले, अनेक कटु प्रसंग माझ्यावरदेखील आले. अनेक कटु प्रसंग व्यासपाठीवरील अनेकांच्या आयुष्यात आलेले आहेत. पण शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता, शिवसेना म्हणजे… ‘पुष्पा’ सारखं तसं काम नाही. आमच्या जन्मापासूनच आम्ही झुकेगा नहीं आहे. आम्ही चित्रपट बघून झुकेगा नहीं हे ठरवत नाहीत. इथे मंचावर मोजके सोडले तर सगळे दाडीवालेच आहेत. आता गौरव (गौरव नायकवाडी) तू सुद्धा दाढी वाढव. सध्या देशात आणि राज्यात दाढीलाच महत्त्व आहे”, असं उदय सामंत मिश्किलपणे म्हणाले.
“या सगळ्या गोष्टींमध्ये आपण विकासात्मक लोकपर्यंत किती जातो? ती खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून व्यासपाठीवरच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समितीच्या सदस्यांना मला त्यांचा एक सहकारी म्हणून विनंती करायची आहे, आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उदाहरणं पाहतो की, ग्रामपंचायतीचा साधा सदस्य झाला तर तो सहा फुटावरुन चालतो. जमिनीवरुन चालत नाही. पण तुम्ही जेवढे नम्रतेने चालाल. जेवढे तुम्ही लोकांबरोबर संपर्क ठेवाल, जेवढे तुम्ही लोकांच्या सुख-दु:खात राहाल, तोपर्यंत तुमच्या राजकीय जीवनाला कधी मरण नाही”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.
“आपल्याला विकासाचा संघर्ष करायचा आहे, विकासाचं स्वातंत्र्य या मतदारसंघाच्या सर्व मंडळींना मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही जो चांगला निर्णय घ्याल त्या चांगल्या निर्णयाबरोबर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आम्ही सर्वसहकारी, संपूर्ण शिवसेना गौरव नायकवाडी यांच्याबरोबर आहे”, असं उदय सामंत आपल्या भाषणात म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा