• Sat. Sep 21st, 2024

नाशिककरांनो सावधान…! वेळीच ओळखा झिकाचा धोका, शहरात एकोणीस गर्भवती संशयित, काय आहेत लक्षणं?

नाशिककरांनो सावधान…! वेळीच ओळखा झिकाचा धोका, शहरात एकोणीस गर्भवती संशयित, काय आहेत लक्षणं?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भारतनगर परिसरातील चोवीसवर्षीय तरुणाच्या लघवी तपासणीत ‘झिका’चे विषाणू आढळून आल्यानंतर या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत वैद्यकीय विभागाच्या पाहणीत भारतनगर परिसरात १९ गर्भवती महिला आढळल्या असून, या संशयित १९ महिलांचे रक्तजल (सिरम) नमुने अधिक तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही लॅब’कडे पाठविण्यात आले आहेत.

‘झिका’चे गर्भवती महिलांवर सर्वाधिक परिणाम होत असल्यामुळे वैद्यकीय विभागाने तीन किलोमीटर परिसरातील महिलांना मच्छरदाणी वापरण्याचा अजब सल्ला दिला आहे.

शहरात डेंग्यूचे थैमान सुरू असतानाच शहरात ‘झिका’नेही गेल्या आठवड्यात ‘एंट्री’ केली आहे. भारतनगरमधील एका चोवीसवर्षीय तरुणाचे नमुने ‘झिका’ पॉझिटिव्ह आल्याने विभागाची झोप उडाली आहे. ‘झिका’ आजाराची लक्षणे जवळपास डेंग्यूसारखीच असतात. ही लक्षणे सर्वसाधारण सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. शहरात ‘झिका’चा पहिला रुग्ण भारतनगर भागात आढळून आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. ‘झिका’चा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असून, गर्भवती महिलेला ‘झिका’ची लागण झाल्यास शिशु मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतींसह जन्माला येते. त्यामुळे ज्या भागात ‘झिका’चा रुग्ण आढळला त्या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील कार्यशाळेत पाठविले जातात. त्यानुसार भारतनगर येथे ‘झिका’चा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदींना गर्भवती महिलांचा शोध घेतल्यानंतर आतापर्यंत १९ गर्भवती महिला आढळल्या. त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही लॅब’कडे पाठविण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
स्मशानभूमीही गहिवरली! तळवाडे कंपनी स्फोटातील ६ जणींची सरणं एकाशेजारी एक, अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा टाहो
झिकाची लक्षणे : ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा, डोकेदुखी.

भारतनगर परिसरात ‘झिका’चा रुग्ण आढळून आला असून, या भागात गर्भवती महिलांचा शोध घेतल्यानंतर आतापर्यंत १९ गर्भवती महिला आढळून आल्या. त्यांचे रक्तनमुने पुणे येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले आहेत.-डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed