• Mon. Nov 11th, 2024
    तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!

    पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. खरं तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, या जागेवर काही पोटनिवडणूक झाली नाही. त्यामुळे काही महिन्यातच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेचा खासदार कोण असेल यासाठी आता सर्वच पक्षातून मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. २०१४ पासून या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकत आहे. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभेवरची पकड निसटली झाली. मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होते. २०१४ आधी भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढाई होत असे. मात्र २०१४ नंतर काँग्रेसला तगडा उमेदवार मिळालेला नाही. दुसरीकडे गिरीश बापट यांच्यानंतर भाजपमध्येही उमेदवारीसाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.

    महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना पाहायला मिळेल. भाजपकडून अनेक नावं समोर येत आहेत तसंच काँग्रेसकडून देखील अनेक इच्छुक तयारीला लागल्याचे दिसत आहे.

    भाजपमधून कुणाची नावे चर्चेत?

    भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांमध्ये विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. पण कसब्याच्या पोटनिवडणुकीचा कौल पाहता पुणे लोकसभेची निवडणूक भाजपसाठी तितकीशी सोपी नसणार. उमेदवार कोण आहे हे भाजपसाठी महत्वाचे ठरणार आहे. भाजप तर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे सुरुवातीपासून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत.

    भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. महापौर म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, मराठा चेहरा, पक्षनेतृत्वाशी जवळीक या मुरलीधर मोहोळ यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र उमेदवारीसाठी वारंवार मिळालेली हुलकावणी हे मोहोळ यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. जगदीश मुळीक यांचीही तयारी सुरू असून बागेश्वर धाम यांचा प्रवचन सोहळा आयोजित करणे हा त्याच तयारीचा भाग असल्याचं मानलं जातं. भाजपकडून सुनील देवधर यांचे नाव पुढे आले असले तरी पक्षाच्या पातळीवर त्याबाबत काही चर्चा दिसून आलेली नाही. तसेच ऐनवेळी नवखा उमेदवार उतरवायचा का हा प्रश्नही आहे. कारण कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपला निवडून आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती.

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले असताना पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस मराठा उमेदवार देण्याबाबत विचार झाल्यास काँग्रेसकडून अरविंद शिंदे आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर राहू शकते.

    काँग्रेसची पुणे लोकसभेवरची पकड निसटली

    दुसरीकडे महाविकास आघाडीमधून काँग्रेस पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करणार हे निश्चित आहे. पारंपारिकरित्या ही जागा काँग्रेसचीच आहे. १९५२ ते १९५७, १९६२ ते १९६७, १९७१ ते १९७७, १९८० ते १९८४, १९८४ ते १९८९, १९८९ ते १९९१, १९९६ ते १९९८, १९९८ ते १९९९, २००४ ते २००९, २००९ ते २०१४ या कालावधीमध्ये तब्बल १० लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा खासदार या मतदारसंघावर निवडून आला आहे. मात्र २०१४ नंतर देशासह पुण्यात देखील काँग्रेसला उतरती कळा लागली आणि काँग्रेसची पुणे लोकसभा मतदारसंघावरील पकड देखील ढिली झाली

    वेध लोकसभा निवडणुकीचा : कल्याण सर्वाधिक चर्चेत, २०२४ च्या निवडणुकीत काय होणार?

    धंगेकरांच्या विजयाने काँग्रेसला आत्मविश्वास

    पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा आहे. रवींद्र धंगेकरांना कसबा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यात मोहन जोशी यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे लोकसभेसाठी ते अधिक प्रयत्नशील आहेत. मोहन जोशी यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे.

    काँग्रेसमधून लोकसभेचा उमेदवार कोण असेल?

    काँग्रेसमधून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे इच्छुक आहेत. सुरेश कलमाडी यांनी पुणे काँग्रेसचे एकहाती नेतृत्व केलं. ते २००४ ते २०१४ दरम्यान पुणे लोकसभेचे खासदार होते. मात्र त्यानंतर पुणे काँग्रेस पक्षाला भाजपला टक्कर देईल असा नेता सापडलेला दिसत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विश्वजीत कदम आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोहन जोशी यांना काँग्रेसने निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. मात्र या दोघांना देखील पराभवला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपकडून पुणे लोकसभेसाठी कोण चेहरा असणार हे निश्चित नसल्याने काँग्रेसला आपली जागा पुन्हा एकदा काबीज करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे काँग्रेस आता नक्की कुणाला मैदानात उतरवणार आणि काय रणनीती आखणार? यावर पुणे लोकसभेचे पुढील गणिते अवलंबून असणार आहेत.

    पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक न घ्यायला मणिपूरसारखी परिस्थिती होती का? मुंबई उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा
    पुण्यात मनसे फॅक्टर महत्वाचा ठरणार

    पुणे लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये असली तरी पुण्यातील मनसे फॅक्टर नाकारून चालणार नाही. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. मागील निवडणुकीमध्ये उमेदवारही न देताना तटस्थ राहिलेल्या मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दैनंदिन नियोजनाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली असल्याने यावेळची पुण्याची जागा ‘मनसे’ लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेवक वसंत मोरे यांची नावे लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. वसंत मोरे यांनी तर आपल्या तयारीला देखील सुरूवात केली आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स लावून ‘पुण्याची पसंत-मोरे वसंत’ असं म्हणत वातावरण निर्मिती करायला वसंत मोरे यांनी सुरूवात केली आहे.

    पुण्याची पसंत मोरे वसंत, कसबा पेठेत मनसेची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं
    यापूर्वी मनसेने दोन वेळेस पुण्यात लोकसभा निवडणुकीत नशीब आजमवले होते. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत रणजित शिरोळे यांनी ७५ हजार ९३० मते घेत मनसेची पुण्यात ताकद असल्याचे सिद्ध केले होते. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत माजी आमदार दीपक पायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी ९३ हजार ५०२ मते मिळविली होती. शिरोळे आणि पायगुडे हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यामुळे पुण्यात मनसेची ताकद आहे हे सिद्ध झाले आहे. आता तर दस्तूर खुद्द ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी असल्याने मनसेने आपली पूर्ण ताकद पुणे लोकसभेसाठी झोकली आहे. मनसेचा पहिला खासदार हा पुण्यातून निवडून येणार असल्याचा निर्धार यावेळेस महाराष्ट्र सैनिकांनी केला आहे.

    विधानसभा निहाय आमदार

    पुणे लोकसभा मतदारसंघात शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ, पर्वती विधानसभा मतदारसंघ, कोथरूड विधानसभा मतदारसंघ, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ, पुणे छावणी मतदारसंघ हे विधानसभा मतदारसंघ येतात.

    • वडगाव शेरी – सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी अजित पवार गट )
    • पर्वती – माधुरी मिसाळ ( भाजप )
    • कोथरूड – चंद्रकांत पाटील ( भाजप )
    • कसबा पेठ – रवींद्र धंगेकर ( काँग्रेस )
    • शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
    • पुणे छावनी – सुनील कांबळे ( भाजप )

    या मतदारसंघात तुलनेने भाजपचे वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नाहीये. त्यामुळे राज्यातील काही महत्त्वाच्या लढाईंपैकी पुणे लोकसभा निवडणुकीची लढाई ही महत्त्वाची मानली जात असून या लढाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

    ख्रिस्ती समुदायाशी नाते जोडण्यासाठी भाजपचा नवा उपक्रम; ख्रिस्ती जोडो अभियानाची करणार सुरुवात, वाचा सविस्तर

    पुण्यात लोकसभा उमेदवार कोण असू शकतात?

    • भाजप – सुनील देवधर, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, स्वरदा बापट
    • काँग्रेस – रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, अरविंद शिंदे
    • मनसे – साईनाथ बाबर, वसंत मोरे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed