‘शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यासाठी जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. परंतु, विधानसभा अध्यक्ष या चाळीस आमदारांना अभय देत असून, भारतीय संविधानाला फासावर लटकवत आहेत,’ अशी वादग्रस्त टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली.
‘निवडणूक आयोग हा मोदी-शहा आयोग असून, ऐऱ्यागैऱ्यांच्या हाती शिवसेनेला सोपविले आहे. मात्र, पक्षाचे नाव व चिन्ह दिले, तरी शिवसेनेची जमिनीत रुजलेली मुळे कोणाला उकरता येणार नाहीत,’ असेही ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आयोजित जाहीर रोखठोक मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क प्रमुख सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, शशिकांत सुतार, पृथ्वीराज सुतार, रघुनाथ कुचिक आदी नेते-पदाधिकारी उपस्थित होते.
‘राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे ‘एक फुल दोन डाऊटफूल’ असून, या तीन घाशीराम कोतवालांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे. कायदा व नियमांचे पालन न करता राज्याची नासाडी व नाचक्की केली जात आहे. त्यामध्ये घटनात्मक पदावर असलेले विधानसभा अध्यक्षही सहभागी आहेत. शिवसेनेतून फुटलेले चाळीस आमदार अपात्र ठरणार आहेत, विधीमंडळ गटनेतापदी एकनाथ शिंदे व प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड पूर्णत: बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने परखडपणे सांगितले आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी रीतसर सुनावणी घेऊन निर्णय द्यायचा आहे. परंतु, ते या चाळीस आमदारांना अभय देत असून, संविधानाला फासावर लटकवत आहेत. अशा विधानसभा अध्यक्षांना मानायला तयार नसून, त्याबद्दल हक्कभंग आला, तरी महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणखी एका खटल्याला सामोरे जायला तयार आहे,’ असे आव्हानही राऊतांनी दिले.
पुणे लोकसभेचा खासदार भाजपचा नसेल
‘राज्याचा मुख्यमंत्री २०२४ मध्ये शिवसेनेचा होणार असून, पुण्यातून किमान तीन आमदार विधानसभेत जातील आणि पुणे लोकसभेचा खासदार हा भाजपचा नसेल, अशी आमची ‘गॅरंटी’ असून, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणारे २०२४ नंतर शिल्लक राहणार नाहीत,’ असे आव्हानही संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
पुण्याचे बँकॉक होत असताना, पालकमंत्री कुठे आहेत
‘महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातमध्ये येत असून, गुजरातमधील ड्रग महाराष्ट्रात आणून मराठी तरुणांची पिढी संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ड्रग्जच्या अड्ड्यांनी पुण्याचे बँकॉक केले जात असून, पुण्याचे नवे पालकमंत्री कोठे आहेत,’ असा सवालही त्यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना केला. ‘पुणे व नाशिकमधील ‘ड्रग रॅकेट’मध्ये शिंदे सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्र्यांचा सहभाग आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले
– भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नवाब मलिक नकोत, मग दहशतवाद्यांशी आर्थिक संबंधांचा आरोप असलेल्या प्रफुल्ल पटेलांवर कारवाई का नाही
– भ्रष्टाचाऱ्यांना फासावर लटकविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची हमी, मग अजित पवार कुठे आहेत?
– जनतेचा ‘इव्हीएम’वर विश्वास नसून, एक तरी निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा.