शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेतेसंदर्भात आतापर्यंत मुंबईत सुरू असलेली सुनावणी सध्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष सुरू आहे. यात शुक्रवारी लांडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी यावेळी लांडे यांची उलटतपासणी घेतली. तुम्ही २१ ते ३० जून २०२२ दरम्यान राज्याबाहेर गेला होतात का? तुम्ही सुरतला गेला होतात? या प्रश्नांना लांडे यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर तुम्ही या दरम्यान सुरतला चार्टड फ्लाईटने गेला होतात का? तुमच्या तेथील राहण्याचे बिल भाजपने अदा केले होते का? असे प्रश्न लांडेंना विचारण्यात आले. यावर ‘मी सुरतला बैलगाडीने जाईन नाही तर रिक्षा चालवित जाईन, तो माझा वैयक्तिक मुद्दा आहे,’ असे उत्तर लांडे यांनी यावेळी दिले.
मतदानाच्या प्रश्नावर आक्षेप
विधानसभा अध्यक्षपदासाठीचे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना तुम्ही मतदान केले होते का? असा प्रश्न यावेळी ठाकरे गटाने विचारला. मात्र, मतदान हा विशेषाधिकार असून त्याबाबत प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, असा आक्षेप यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी घेतला. मात्र, त्यांना अपात्र ठरविण्यासाठी हाच मुद्दा महत्त्वपूर्ण असल्याचा प्रतिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावर शिंदे गटाचा आक्षेप लेखी नोंदविण्याची ठाकरे गटाची मागणी नार्वेकरांनी मान्य केली. लांडेंना या प्रश्नाला उत्तर दिले नाही.
आगाऊ सह्या घेतल्या
वर्षा बंगल्यावर शिवसेना विधिमंडळाच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये सदस्यांची यादीचा कागद देण्यात आला. त्यावर आम्ही सह्या केल्या हे खरे. मात्र, तेव्हा या कागदांच्या वरच्या भागावर काहीच छापील लिहिलेले नव्हते. साक्षी दरम्यान दाखविण्यात आलेल्या कागदावर हस्ताक्षराने बैठकीबाबत लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आमच्याकडून आगाऊ सह्या घेण्यात आल्या अशा आशयाची साक्ष यावेळी लांडे यांनी दिली.