शुक्रवार ८ डिसेंबरपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार असून ११ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. पनवेल महापालिकेत ४१ संवर्गांतील वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतच्या पदांच्या भरतीप्रक्रियेची जबाबदारी राज्य सरकारच्या नियमानुसार पनवेल महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीला दिली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील एकूण ३७७ पदांकरिता ही भरती होणार आहे.
सहाय्यक लेखनिक पदासाठी देखील अंपगांचे अर्ज दाखल आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराला परीक्षा देणे सोयीचे जावे म्हणून २१ जिल्ह्यांमध्ये ५७ केंद्रात परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर महापालिका वर्ग २ चा एक अधिकारी, एक लिपिक आणि एक शिपाई देण्यात येणार आहे. चार दिवस सकाळी आठ ते ११, दुपारी १ ते ३ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळीत परीक्षा होईल. पालिकेच्या भरती प्रक्रियेत सर्वच विभागातील गट अ,गट ब,गट क आणि गट ड सर्वांमधील पदांसाठी भरतीप्रक्रिया पार पडणार आहे. पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली.
पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणार्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये ३७७ पदांसाठी एकुण ५४ हजार ५५८ अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्यावतीने ४१ संवर्गातील गट’अ’ ते गट ‘ड’ मधील ३७७ रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा चार दिवस ११ सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा पुर्णत: पारदर्शक होणार आहे. परिक्षेबाबत खोट्या अफवा पसरविणार्यांवर महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.