• Sat. Sep 21st, 2024
विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद होते. त्यामुळे विधानभवन परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे बॅग मॅन्युअली स्कॅन करण्यात आले. स्कॅनिंग मशिन बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

सध्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संपूर्ण मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ, सचिवालय, लोकप्रतिनिधी विधानभवन परिसरात असतात. लोकप्रतिनिधींना भेटायला येणारे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ येथे असते. दररोज हजारोंच्या संख्येने येथे ये-जा असते. अशा स्थितीत सामान्य नागरिक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या प्रवेशद्वाराने येतात तिथे बॅग स्कॅन करण्यासाठी स्कॅनिंग मशिन ठेवण्यात आले आहे. ही मशिन गुरुवारी बंद होती. परिणामत: आत येणाऱ्या प्रत्येकाची बॅग बंदोबस्तात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी मॅन्युअली तपासली.

बॅग स्कॅनिंग मशिनमध्ये बॅगेच्या आत असलेल्या सर्व वस्तू स्कॅन होतात. त्याचे चित्र पुढे असलेल्या मॉनिटरवर दिसून येते. या मशिन मेटल डिटेक्टर असतात. मात्र, मशिन बंद असल्याने आत येणाऱ्या प्रत्येकाच्या बॅगमधील एकूण एक वस्तू तपासणे कर्मचाऱ्यांना शक्य झाले नाही. याचा गैरफायदा घेऊन घातपात होण्याची शक्यता अधिक आहे. परिणामत: मशिन सुरू असायला हवे. अन्यथा कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असणार, असादेखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

खर्रा, तंबाखू घेऊन जा बिनधास्त

विधानभवनात आत जाताना प्रवेशद्वारावर कडेकोट तपासणी होईल, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात कुठल्याही स्वरूपाची कडेकोट तपासणी होत नसल्याची प्रचिती गुरुवारी आली. मागील वर्षी आत येणाऱ्या प्रत्येकाला खर्रा, तंबाखू, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ नेण्यास प्रतिबंध होता. कुणाकडे असे पदार्थ आढळल्यास ते जप्त केले जायचे. यंदा, बिनधास्तपणे तंबाखूजन्य पदार्थ आत घेऊन येणाऱ्यांची मोठी संख्या आढळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed