• Sat. Sep 21st, 2024
भरधाव सुमोची बाईकला धडक, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नाशिक हळहळलं

नाशिक : केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे ( वय ४२, रा.मुळ, कुळवंडी गाव, ता.पेठ) यांचे काल मंगळवारी अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी राजाराम सहारे यांचे रवींद्र सहारे हे एकुलते एक चिरंजीव होते. ते सुट्टीसाठी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गावी आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हरसूल गावातून ते दुचाकीने दोघा ओळखीच्या लोकांसोबत संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुळवंडी गावाकडे जात होते. यावेळी मुख्य रस्त्यावरील पालीफाटा याठिकाणी एका भरधाव जाणाऱ्या टाटा सुमोने धडक दिली. या धडकेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या दोघा इसमांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाणे : मेट्रोच्या कामादरम्यान २० ते २५ फुटांवरून कोसळून कामगाराचा मृत्यू
सीआरपीएफचे जवान रवींद्र सहारे हे नाशिकच्या हरसूलजवळ पेठ तालुक्यात येणाऱ्या मुळ कुळवंडी गावचे भुमीपुत्र होते. ते मागील अनेक वर्षांपासून सीआरपीएफमध्ये कर्तव्यावर राहून देशसेवा बजावत होते. अलीकडेच त्यांना पदोन्नती मिळाल्याने कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण होते. त्यांचे वडील राजाराम सहारे हे शेतकरी असून रवींद्र सहारे हे त्यांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन शाळकरी मुले असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने हरसुलसह संपूर्ण पेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे. ते दोन ते तीन दिवसांसाठी जम्मू-काश्मिर येथून राहत्या घरी कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले होते.

वर्षभरानंतर ते सीआरपीएफच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान, घटनास्थळाहून अपघातग्रस्त सुमो चालक गाडी सोडून फरार झाला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविंद्र सहारे यांच्या अपघाती निधनाची माहिती त्यांच्या सीआरपीएफच्या पुलवामा येथील युनिटला कळविण्यात आली असून मुंबई येथून त्यांच्या दलाचे एक पथक अंत्यसंस्कारासाठी हरसूल गावात दाखल होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांच्या मुळ गावी कुळवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी देखील माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed