• Sat. Sep 21st, 2024

ससून रुग्णालयाबाबत मोठी अपडेट; दीड वर्षापासून बंद सिस्टीम पुन्हा होणार सुरु, रुग्णांना मिळणार दिलासा

ससून रुग्णालयाबाबत मोठी अपडेट; दीड वर्षापासून बंद सिस्टीम पुन्हा होणार सुरु, रुग्णांना मिळणार दिलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली ‘हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांची माहिती हाताते न लिहिता ‘एचएमआयएस’ प्रणालीद्वारे ऑनलाइन नोंदविता येणार आहे. यामुळे दीड वर्षानंतर ‘ससून’मधील कारभार पुन्हा ऑनलाइन होणार आहे.

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधील कामकाज पूर्वी ‘एचएमआयएस’ प्रणालीद्वारे चालत होते. मात्र, जुलै २०२२मध्ये अचानक ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. तेव्हापासून सर्व रुग्णालयांमधील ‘एचएमआयएस’ प्रणाली बंद आहे; परंतु आता दीड वर्षानंतर पुन्हा सर्व रुग्णालयांमध्ये ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ससून रुग्णालय बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असल्याने ‘ससून’मधील ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘एचएमआयएस’ प्रणाली बंद असल्याने डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांचा केस पेपर, दिलेले उपचार, डिस्चार्ज कार्ड याबरोबरच संपूर्ण माहिती हाताने लिहावी लागत होती. रुग्णांनाही तपासणी अहवाल एका विभागातून दुसऱ्या विभागांत फिरावे लागत होते. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा संथ झाल्याचेही दिसून आले होते. ‘एचएमआयएस’ बंद असल्याचा फटका डॉक्टर, कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णांनाही बसत होता. त्यामुळे ही प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. प्रणाली पुन्हा सुरू झाल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांची माहिती हाताने लिहावी लागणार नाही. त्यामुळे रुग्णालयांमधील फाइल आणि कागदांचा वापर कमी होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

काय आहे ‘एचएमआयएस’ प्रणाली?

‘एचएमआयएस’मध्ये रुग्ण नोंदणी ऑनलाइन केली जाते. रुग्णाला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. डॉक्टरांनी रुग्णांना दिलेली औषधे आणि उपचारांची नोंद ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. दुसऱ्यांदा जेव्हा रुग्ण रुग्णालयात येतो, तेव्हा ‘एचएमआयएस’मध्ये रुग्णांचा ओळख क्रमांक टाकताच रुग्णाचा संपूर्ण इतिहास एका क्लिकवर डॉक्टरांना दिसतो.
कैद्याच्या पोटातील किल्लीचे गौडबंगाल; महिन्यात दुसऱ्यांदा आढळली चावी, कुठलं गुपित ‘कुलुपूबंद’?
‘एचएमआयएस’ प्रणालीचे फायदे

– रुग्णांच्या नोंदी ठेवता येतात.
– तपासणी अहवाल एका क्लिकवर उपलब्ध होतो.
– रुग्णाचा संपूर्ण इतिहास एका क्लिकवर डॉक्टरांना कळतो.
– कमी वेळेत सर्व प्रक्रिया होते.
– डॉक्टरांना कागदावर लिहिण्याची गरज पडत नाही.

राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुन्हा ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिन्याच्या शेवटपर्यंत ही प्रणाली सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवीन प्रणाली पूर्वीच्या तुलनेत अद्ययावत करण्यात आली आहे.- दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed