• Mon. Nov 25th, 2024

    बावनकुळेंनी वाजवला ढोल, कार्यकर्त्यांनी धरला ठेका; भाजपच्या दणदणीत विजयानंतर नागपुरात जल्लोष

    बावनकुळेंनी वाजवला ढोल, कार्यकर्त्यांनी धरला ठेका; भाजपच्या दणदणीत विजयानंतर नागपुरात जल्लोष

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर रविवारी नागपुरात शहर भाजपच्यावतीने धंतोली येथील कार्यालयासमोर ढोल-ताशे वाजवून, फटाके उडवून जल्लोष करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शहर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तर तेलंगणमध्ये विजय मिळवूनही काँग्रेसच्या गटात मात्र शांतता दिसली.

    मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर जसजसा निकाल भाजपच्या बाजूने लागत असल्याचे स्पष्ट होऊ लागले, तसे भाजप कार्यकर्ते शहर भाजप कार्यालयात जमण्यास सुरुवात झाली. सकाळी ११ वाजतानंतर या तिन्ही राज्यांमध्ये भाजपची वाटचाल बहुमताकडे होऊ लागली अन् कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. काही वेळानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे भाजप कार्यालयात दाखल झाले. नेतेमंडळी येताच ढोल-ताशे वाजवत व फटाके फोडत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा जयजयकार करत घोषणा दिल्या. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला.

    ‘भाजपने निवडणुकांमध्ये विकासाचा अजेंडा पुढे केला. शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्याचे काम केले. पंतप्रधानांवर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेने मतांच्या माध्यमातून उत्तर दिले’, असे कुकडे यावेळी म्हणाले. संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, अश्विनी जिचकार, गुड्डू त्रिवेदी, विष्णू चांगदे, संजय बंगाले, कीर्तीदा अजमेरा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
    भाजपचा विजयोत्सव; तीन राज्यांमध्ये सत्ता मिळविल्याने नाशिक शहर-जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष
    ‘मोदींच्या कामावर जनतेचा विश्वास’

    ‘निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘पनौती’ अशी टीका करण्यात आली होती. या निकालाने नेमके कोण पनौती आहे, हे दाखवून दिले आहे. काँग्रेसने गेल्या ६५ वर्षांत भ्रष्टाचार केला, गरीब कल्याणाचे काम केले नाही. याउलट पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामावर विश्वास दाखवत या तिन्ही राज्यांत जनतेने पुन्हा एका भाजपला मतदान केले. मोदींवर टीका करणे जनतेला आवडत नाही, हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे’, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

    २०२४चा कौल स्पष्ट झाला!

    ‘तीन राज्यांत भाजपला मिळालेल्या यशानंतर जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. गेल्या नऊ वर्षांत देशाने मोदींच्या नेतृत्वात सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. मोदी म्हणजे गॅरंटी हे मतदारांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे २०२४मध्ये देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे’, असे माजी खासदार अजय संचेती म्हणाले.

    काँग्रेसच्या गटात शांतता

    लोकसभा निवडणुकांपूर्वी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश अपेक्षित होते. मात्र, तेलंगण वगळता राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, तर मध्य प्रदेशमध्येही अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गटात शांतता होती. तेलंगणचा विजयही काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *