आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी अजित पवार गटाच्या आरोपांना अनुल्लेखाने प्रत्युत्तर दिले. ‘आपल्या ज्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला, पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून आपल्यावर टीका-टिप्पणी, हल्ले केले जात आहेत; परंतु तुम्ही कोणाच्या तिकिटावर निवडून आला, तुमचे चिन्ह काय होते, तुम्ही कोणाचे छायाचित्र वापरले, आता तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारले आणि कोठे गेला, याचा विचार सर्वसामान्य करीत असतात. देशात व राज्यात जागरूक सर्वसामान्य माणूस असल्याने परिवर्तन करण्याची धमक समाजात आहे. त्यासाठी तयारी करा,’ अशा सूचनाही त्यांनी केल्या.
‘संघटना मजबूत केल्यास विधानसभेत युवक आघाडीची मोठी फळी मोठ्या मताने निवडून जाईल. ते राज्य चालवून लोकांचे प्रश्न सोडवतील. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाने प्रत्येक मतदारसंघाची आखणी करून ती जागा विजयी करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. आम्ही विचारांशी बांधील आहोत, संधिसाधू नाही, ही भूमिका राज्याच्या जनतेला सांगण्याचे ऐतिहासिक काम पदाधिकाऱ्यांनी करावे. त्यासाठी विधानसभा कार्यक्षेत्रात संपर्क वाढवा, प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांचा संच उभा करा, पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपबरोबर न जाण्याचीच भूमिका
‘भारतीय जनता पक्षासोबत जायचे नाही, अशी आमची स्वच्छ भूमिका होती. भाजपसोबत जाण्याचा विचार काहींनी मांडला होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक लढविली होती. या भूमिकेच्या विसंगत निर्णय मतदारांची फसवणूक आहे, अशी माझ्यासह अनेक सहकाऱ्यांची भूमिका होती,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दावे शनिवारी फेटाळले. ‘पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आणि मागे घेण्याचा निर्णय घेण्याची कुवत माझ्यामध्ये आहे,’ असेही त्यांनी ठणकावले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात शनिवारी झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या आरोपांचा समाचार घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, अनिल देशमुख आदी उपस्थित होते. ‘विधानसभा निवडणूक लढविताना भाजपमध्ये जाण्यासाठी मते मागितली नव्हती. भाजपसह तत्सम पक्षांविरोधातील भूमिकेला लोकांनी पाठिंबा दिल्याने आमचे आमदार निवडून आले. ‘राष्ट्रवादी’च्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे चिन्ह, तिकिटावर निवडणूक लढविताना त्याच्या विसंगत भूमिका लोकशाहीत योग्य नाही,’ असे पवार म्हणाले. ‘आमची भूमिका भाजपविरोधी आहे, तितकी शिवसेनेच्या विरोधात नाही,’ असे सांगताना शिवसेना, काँग्रेस व ‘राष्ट्रवादी’ने स्थापन केलेल्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती,’ असा चिमटाही पवार यांनी काढला.
किती मजले ‘ईडी’च्या ताब्यात ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी २००४मध्ये भाजपसोबत जाण्याचा ‘राष्ट्रवादी’चा विचार होता, असा दावा केला होता; तसेच या संदर्भात पुस्तक लिहिणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबत विचारणा केली असता, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जावे, असा पटेलांचा आग्रह होता. परंतु, मी नकार दिल्याने ते थांबले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिली,’ असे पवारांनी सांगितले. ‘पटेलांनी त्यांच्या पुस्तकात लोक पक्ष सोडून का जातात, त्यांच्या घराचे किती मजले ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते, ही प्रकरणेही लिहावीत. त्यातून ज्ञानात भर पडेल,’ असा टोलाही पवारांनी लगावला.