Kalyan Sandip Mali Notice of Eviction: कल्याणमधील भाजप पदाधिकारी संदीप माळी यांना मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. तर काल दुपारी त्यांना मानपाडा पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
हायलाइट्स:
- कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे सेना आणि भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
- भाजपच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षांना ठाणे जिल्ह्यातून केले तडीपार
- नोटीस मिळताच उपाध्याक्षांचा संताप; काय म्हणाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील भाजप पदाधिकारी संदीप माळी यांना मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. तर काल दुपारी त्यांना मानपाडा पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. संदीप माळी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्या निवडणुकीत संदीप माळी कल्याण ग्रामीणमधून मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारात सक्रिय काम करत असल्याचं बोललं जात होतं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी कल्याण ग्रामीणच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतली. या सभेनंतर माळी यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रकारे भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे तशी दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्याविरोधात का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपची कोंडी केली जात असल्याचीही चर्चा रंगली आहे.
MNS Manifesto: महिला, रोजगार ते गडकिल्ले, ‘आम्ही हे करु’, विधानसभेसाठी मनसेचा चारकलमी जाहीरनामा
नोटीस मिळताच संदीप माळी यांनी संताप व्यक्त केला असून माळी म्हणाले की, ”महायुतीचा धर्म पाळला त्याचे फळ मिळाले…मी रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे… कोणाला घाबरणारा माणूस नाही…मला पोलीस ठाण्यात बोलावून तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे…लोकसभेमध्ये युती म्हणून आम्ही युतीधर्म पाळला आहे…कोणालाही दमदाटी केलेली नाही, त्रास दिलेला नाही. तरीसुद्धा फक्त राजू पाटील हे माझे मित्र आहेत. मैत्री केली तर किती त्रास झाला आहे पहा, मी आगरी समाजाला आवाहन करतो तसेच भाजपाचे कल्याण ग्रामीणचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आवाहन करतो. आज ही वेळ माझ्यावर आली, उद्या तुमच्यावर येऊ शकते. कारण लोकसभेमध्ये युतीधर्म पाळला त्याचे फळ मला मिळाले आहे. आता तरी जागे व्हा. लोकसभेत मनसेने आपल्याला मदत केली होती. राजू पाटील हे माझे जवळचे नातेवाईक देखील आहेत. त्यांना मदत केली असा संशय आल्याने मला तडीपार करण्यात आले आहे”, असं माळी यांनी सांगितले.
याबाबत आमदार राजू पाटील म्हणाले की काल गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता. ते या कार्यक्रमात म्हणाले की, ”संदीप माळी माझा मित्र आहे, माझे नातेवाईक आहेत. प्रत्येक निवडणुकीत कोणी काही पक्ष बघत नाही. त्यांच्या गावात मी गेलो त्यांनी माझा सत्कार केला. याचा एवढा राग शिंदे पिता पुत्राला आला की, माळी यांना रात्रभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. मी त्यांना जाऊन भेटलो, ते म्हणाला, तडीपार केलं तर करू दे, तुम्ही बिनधास्त राहा. राजकारण एका लिमिटच्या पुढे जाऊन वातावरण गढूळ करायचं काम शिंदे पिता पुत्रांनी केलं आहे. ते कुठेतरी संपवायची वेळ आलेली आहे” अशा शब्दात राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली आहे.