डॉल्बी वाजवण्याच्या स्पर्धेत तरुणांनी डॉल्बीच्या ठेक्यावर चक्क बंदुका, तलवारी व कोयता नाचून साताऱ्यात दहशत माजवण्याचा प्रकार केला आहे. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन बंदुका, तलवारी व कोयते नाचणाऱ्या संशयित सात जणांना तात्काळ अटक केली आहे, तर फरारी संशयित आरोपींचा तपास सुरू केला आहे.
साताऱ्यात खुलेआम गेल्या अनेक दिवसांपासून प्राणघातक शस्त्रे नाचवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे साताऱ्यात चाललंय तरी काय आणि साताऱ्यात कायद्याचं राज्य आहे की नाही, असा प्रश्नही आता या प्रकारामुळे उपस्थित होऊ लागला आहे. दहशत माजवणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सातारकर जनता करू लागली आहे.
साताऱ्यातील कोडोली व मेढ्यातील दोन डॉल्बी व्यवसायिकांमध्ये इंस्टाग्रामवर डॉल्बीच्या आवाजावरून पैज लावली होती. कोणाची डॉल्बी सिस्टीम सर्वात जास्त वाजते, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी या दोन डॉल्बीचालकांनी साताऱ्यातील लिंबखिंड परिसरात असलेल्या गौरीशंकर कॉलेजजवळ राष्ट्रीय महामार्गावर डॉल्बी स्पीकर वाजवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. ही डॉल्बीची स्पर्धा मोठमोठ्या आवाजात सुरू असतानाच काही हुल्लडबाज तरुणांनी डॉल्बीच्या ठेक्यावरच चक्क बंदुका, तलवारी व कोयते नाचून साताऱ्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच सातारा तालुका पोलिसांनी संबंधित घटनास्थळी जाऊन या घटनेची शहानिशा करून दहशत माजवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अद्यापही तपास सुरू असून, दहशत माजवणाऱ्या अनेक तरुणांना शोधण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. घटनास्थळी प्राणघातक शस्त्रासह सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुमारे ५० जणांवर शस्त्रबंदी कायदा, बेकायदा जमाव जमवणे व विनापरवाना सिस्टीम लावणे अशा कलमानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास तालुका पोलीस करत आहेत, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास घोडके यांनी दिली आहे.