• Sat. Mar 14th, 2026

    महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी करणारा अर्थसंकल्प – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 6, 2026
    महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी करणारा अर्थसंकल्प – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    मुंबई, दि. ६:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प केवळ आकडे नाहीत; तर वास्तवाची जाणीव व भविष्याची झेप घेत २०४७ कडे जाणाऱ्या विकसित महाराष्ट्राचा प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासनाचे सूत्र निश्चित करणारा रोडमॅप आहे. या अर्थसंकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायम ठेवणाऱ्या घोषणांमुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी बांधव व बहिणींना अभूतपूर्व दिलासा मिळाला, असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

    ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्याने तसेच, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार असल्याने मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले

    महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी करणारा अर्थसंकल्प असून, ग्रामीण विकासासोबतच नागरी भागातील सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

    २०४७ पर्यंत ७० टक्के लोकसंख्या नागरी भागातील असेल हे सूत्र लक्षात घेऊन राज्यात दहा ठिकाणी नागरी शहरी विकास प्राधिकरणे स्थापन करण्यासोबतच एक हजार लोकसंख्या असलेली गावे कॉंक्रिट रस्त्याने जोडण्याचा महत्वाकांक्षी रस्ते निर्मिती प्रकल्प म्हणजे शहरी व ग्रामीण भागाचा नियोजनबद्ध विकास करण्याची मुहूर्तमेढ आहे.

    ज्यांनी आपला महाराष्ट्र घडविला, माणुसकीचा संस्कार आपल्यावर केला अशा थोर समाजसुधारकांच्या स्मरणार्थ येणारे वर्ष ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ साजरे करण्यात येणार आहे, ही या अर्थसंकल्पाची सामाजिक जाणीवेची महत्वाची बाजू आहे.

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संसदीय कारकिर्दीची दखल म्हणून ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्याची घोषणा आपल्या कर्तव्यदक्ष नेत्याला वाहिलेली अनोखी आदरांजली आहे.

    पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, शेतीविकास, ग्रामविकास, उद्योग, ऊर्जा, विमानतळे, रस्ते, मेट्रो, रेल्वे असा वाहतूक विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासनात वापर, रोजगाराभिमुख विकसित पर्यटन, परवडणारी घरे, तिसरी मुंबई, रामटेकजवळ तिसरी चित्रपट नगरी, नवीन नागपूर, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सवलत, विविध महामंडळासाठी योजना, स्टार्टअपला प्रोत्साहन, सर्वसामान्यांना आरोग्य, सांस्कृतिक वारसा, क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे, राज्याचा प्रशासकीय दर्जा उन्नत, पारदर्शक, गतिमान व उत्तरदायी करण्यासाठी प्रयत्न करणार, शासनात ७५ हजार नवीन पदभरती, नागरिकांच्या मालमत्तांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी धोरण, स्मार्ट पोलिसिंग, महसूल प्रणालीचे आधुनिकीकरण, महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण, पर्यावरण संरक्षण, मुद्रांक अधिनियमातील सुधारणा म्हणजे वेगवान सरकारची धडाकेबाज कामगिरी आहे.

    महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात हा अर्थसंकल्प नक्कीच सकारात्मक बदल घडवेल असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    ०००

    बी.सी.झंवर/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed