सात वर्षाचा प्रेम जितेंद्र पाटील हा पालघर तालुक्यातील कुडण गावात आपल्या कुटुंबियासोबत राहतो.मंगळवारी पहाटे सात वाजताच्या सुमारास त्याच्या घर परिसरात आसपास दाट धुके पसरले होते. यावेळी प्रेम हा खाऊ आणण्यासाठी जवळच्याच किराणा दुकानात जात असताना त्याच्यावर अचानक एका प्राण्याने हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर प्रेमने जोर जोरात आरडाओरड केल्यानंतर जवळपास असलेले नागरिक घटनास्थळी धावत आले. मात्र तोपर्यंत हा प्राणी घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात सात वर्षाचा प्रेम गंभीर जखमी झाला, त्याचा डोक्याला आणि चेहर्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.उपचारासाठी गंभीर जखमी झालेल्या प्रेम याला सिलावासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रेमवर हा हल्ला कुत्रा किंवा अन्य वन्य प्राण्याने केल्याची शक्यता पालकांना वाटल्यामुळे त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र त्यानंतर तारापूर व आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची बातमी समोर आल्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. प्रेमवर झालेल्या जखमांचा अभ्यास करून हा हल्ला बिबट्याने केला असल्याची शक्यता उपचार करणारे डॉक्टर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आल्यानंतर आता बोईसर वनपरीक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, डहाणू वनविभाग, डहाणूचे वन्यजीव बचाव पथक आणि तारापूर पोलिसांनी बिबट्याचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याने व परिसरात बिबट्याचा वावर असल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News