• Sat. Sep 21st, 2024
१४० जेसीबींतून पुष्पवृष्टी, १० क्विंटलचा हार, ४० हजार स्केअर फुटांचं होर्डिंग, जरांगेंची सभा

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरातील पांजरा पोळ मैदानावर १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सभा होणार आहे. ७० ते ८० एकरावर या सभेचे नियोजन करण्यात आले असून, सभेपूर्वी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली दरम्यान विविध समाज बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे

मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याला त्यांच्याच म्हणजे जालना जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे. १ डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांची जाहीर सभा जालना शहरांमध्ये होत आहे. या ठिकाणी मोठी तयारी मराठा समन्वयकांनी केली आहे. ७० ते ८० एकराच्या मैदानावरती ही सभा होणार असून मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १४० जेसीबींद्वारे त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव होणार आहे. १०१ उखळी तोफा वाजविण्यात येणार असून, शहरात चाळीस हजार स्केअर फुटाची वेगवेगळी होर्डिंग लावण्यात येणार आहेत. सभास्थळी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी दहा क्विंटलचा शंभर फुटाचा हार देखील तयार करण्यात येणार आहे.

सभेला १० लाख मराठा बांधव उपस्थित राहणार

मनोज जरांगे पाटील यांची १ डिसेंबर रोजी जालना शहरात रेकॉर्ड ब्रेक जाहीर सभा होणार असून या सभेसाठी १० लाख मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेपूर्वी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी १० वाजता मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे, या मोटार सायकल रॅलीत २० हजार समाज बांधव सहभागी होणार आहेत. शहरातील चौका- चौकात मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले जाणार असून सभा स्थळी तोफांची सलामी देवून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या वातावरणनिर्मितीसाठी शहरातील विविध भागात महापुरुषांच्या तसबीरीसह मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed