• Mon. Nov 25th, 2024
    शिरूर लोकसभेसाठी आंबेगाव ‘टर्निंग पॉइंट’, दोन मित्रांच्या पावलावर पुढची गणितं

    पुणे : लोकसभा निवडणुकांचे येत्या काही महिन्यांत बिगुल वाजतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या होऊ लागली आहे. शिरूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी आंबेगाव तालुका हा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यामुळे याची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

    शिरूर लोकसभेच्या दृष्टीने आंबेगाव तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. त्यानंतर राज्याचे राजकारण पूर्णतः बदलले. शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरे गट तर राष्ट्रवादीत शरद पवार गट, अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यामुळे अनेक समीकरणे बदलत चालली आहेत. त्यात आता लोकसभेच्या जागा वाटपाबाबत तिढा अनेक ठिकाणी कायम आहे. शिरूर लोकसभेसाठी शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छुक आहेत, तर शरद पवार गटाकडून सध्या विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आहे. मात्र पुढच्या उमेदवारीबाबत त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच भाजपकडून आमदार महेश लांडगे हे देखील शिरूर लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. येणाऱ्या काळात अजित पवार देखील या जागेसाठी इच्छुक असू शकतात. जर काही सूत्रे फिरली तर शिवाजीराव आढळराव पाटील अजितदादा गटात जाऊ शकतात. त्यामुळे पुढे दादा आढळराव पाटलांना उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत आढळराव पाटील यांच्याकडून अधिकृत सांगण्यात आले नसले तरी मतदारसंघात मात्र जोरदार चर्चा सुरू आहेत. पण दिलीप वळसे पाटील यांना आदेश मिळाले तर ते देखील लोकसभेसाठी उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेसाठी आंबेगाव तालुका महत्त्वाचा ठरणार आहे.

    दोन मित्रांची प्रतिष्ठा पणाला

    दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे पण अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. काही काळ त्यांनी शरद पवार यांच्यासाठी एकत्र काम केलेलं आहे. मात्र काही तात्विक मतभेदांमुळे आढळराव पाटील शिवसेनेसोबत गेले होते. त्यांनी तीन वेळा या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. आता पुन्हा एकदा आढळराव पाटील यांच्या भोवती शिरूरचं राजकारण फिरण्यास सुरुवात झाली आहे.

    देवदत्त निकमही इच्छुक

    दिलीप वळसे पाटील यांच्या हाताला धरून राजकारणात प्रवेश केल्यानंतर भीमाशंकर साखर कारखान्यांचे विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी यंदाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत वळसे पाटील यांच्याशी फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढवून विजय मिळवून दाखवला. वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. दुसरीकडे शरद पवार यांना साथ देत असलेले कोल्हे अजितदादांकडे जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. जर तसं झालं तर पवार गट देवदत्त निकम यांना उमेदवारी देऊ शकतो.

    त्यामुळे येणाऱ्या काळात शिरूर लोकसभेची गणिते ही आंबेगाव तालुक्याभोवती फिरणार हे नक्की. त्यामुळे ही जागा आता नेमकी कोण लढवणार? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पण आंबेगाव तालुका हा टर्निंग पॉइंट ठरणार हे नक्की.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *