राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला आणि त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेतला. शैनेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे राष्ट्रपतींचे स्वागत करण्यात आले.ज्या चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपींनी दर्शन घेतले, तेथे पूर्वी महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. अनेक वर्षांपासून हा नियम होता. त्या विरोधात अनेकदा महिला संघटनांची आंदोलने झाली. मात्र, २०१५ मध्ये भू माता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन यासाठी निर्णायक ठरले. पुढे देवस्थानने निर्णय घेत चौथरा सर्वांसाठी खुला केला.
राष्ट्रपतींचे शनिदर्शन…
राष्ट्रपती मुर्मू यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली. मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
राष्ट्रपतींचे मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर उदासी महाराज मठात अभिषेकही केला. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.
तृप्ती देसाई म्हणाल्या…
आज देशाच्या सर्वोच्चपदावरील महिला राष्ट्रपती मुर्मू यांनी शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ज्या चौथर्यावर महिलांना प्रवेश नव्हता तो प्रवेश आमच्या आंदोलनामुळे आणि संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सुरू झाला. पण तो अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि आज त्याच शनिदेवाच्या चौथर्यावर राष्ट्रपती मुर्मु यांनी जेव्हा अभिषेक घातला तेंव्हा खूप छान वाटले. हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ही आपल्या संविधानाची ताकद आहे. ज्यांनी विरोध केला होता त्यांना आज हे समजलेच असेल कारण याच संविधानाच्या अधिकारामुळे राष्ट्रपतीपदी महिला विराजमान आहे. आम्हाला विरोध करणारे गावकरी आणि ट्रस्टी आज राष्ट्रपतींना सन्मानाने चौथर्यावर घेऊन गेले असतील, आणखी काय पाहिजे? आज आम्ही केलेल्या आंदोलनामुळे देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या महिलेला तैलाभिषेक चौथर्यावर जाऊन घालता आला, याचा आम्हाला गर्व आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News