इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) जम्मू आणि काश्मीर सरकारच्या उच्च शिक्षण परिषद यांच्या विद्यमाने ‘कॉलेज ऑन व्हिल्स’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपक्रमात भारत गौरव रेल्वेगाडीतून ८०० विद्यार्थिनी आणि १०० विविध विषयांचे प्राध्यापकांचा मुंबईसह वर्धा, दिल्ली, अहमदाबाद, गोवा शहरांना भेट देण्यासाठी १९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. अभ्यास दौऱ्यातील ५०० विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था गोरेगाव पूर्वेतील आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली होती.
उर्वरित विद्यार्थिनी-प्राध्यापकांची व्यवस्था साकीनाक्यातील हॉटेलमध्ये करण्यात आली होती. सर्वांची जेवणाची व्यवस्था गोरेगावमधील हॉटेलमध्ये करण्यात आली होती. दिल्ली आणि अहमदाबादच्या तुलनेत मुंबईतील व्यवस्था अतिशय वाईट होती, असे विद्यार्थिनींबरोबर आलेले प्राध्यापक राजेश सिंग यांनी सांगितले. सुमारे ८०० व्यक्तींच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात केवळ १०० व्यक्तींसाठी व्यवस्था करण्यात आली. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. जेवण करताना २० मिनिटांसाठी वीज गेल्याने काही नागरिक पळून गेले. यामुळे गोंधळात आणखी भर पडली. कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थिनींचे रेकॉर्डिंग होत असल्याचे समजताच एका विद्यार्थिनीने वाद घातला.
यावेळी कर्मचाऱ्यांचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये दुसरे आक्षेपार्ह फोटो आढळून आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. हॉटेलमधील खोल्या अस्वच्छ होत्या. त्यातून कुबट दुर्गंधी येत होती. बेडवरील चादरीवर रक्ताचे डाग असल्याने विद्यार्थिनींनी अशा खोल्यांमध्ये राहण्यास नकार दिला होता, असेही प्राध्यापकांनी स्पष्ट केले. खोल्या अस्वच्छ असल्याने विद्यार्थींनींनी खोल्यांसमोरील मोकळ्या जागेत झोपण्याचा निर्णय घेतला. यासाठी गाद्यांची मागणी करण्यात आली. तीदेखील पूर्ण झाली नाही. यामुळे रात्रभर विद्यार्थिनी बसून होत्या.
विशेष म्हणजे, दौऱ्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारने पावणे पाच कोटींचा खर्च केला आहे. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील अनुभव भयावह होता, असे ही विद्यार्थिनींनी सांगितले. या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. कंत्राटदारासह दोषी रेल्वे अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे आयआरसीटीसी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (अतिरिक्त कार्यभार) सीमा कुमार यांनी सांगितले. हॉटेलमधील गैरसोई पाहिल्यानंतर विद्यार्थिनीनी रेटिंग देण्यास सुरुवात केली. यावेळी ‘याच हॉटेलमध्ये गेल्या एप्रिलमध्ये मुंबई पोलिसांनी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला’, अशी माहिती त्यांच्यासमोर आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी हॉटेलमधील खोल्यांमध्ये राहण्यास ठाम नकार दिला.