• Fri. Nov 15th, 2024

    मराठी पाट्यांवरून शिंदे सरकारवर हल्लाबोल, जरांगे पाटलांचा प्रश्न विचारताच राज ठाकरे निघून गेले

    मराठी पाट्यांवरून शिंदे सरकारवर हल्लाबोल, जरांगे पाटलांचा प्रश्न विचारताच राज ठाकरे निघून गेले

    पुणे : बाळासाहेबांचे विचार विचार असं सारखं सांगत असता मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात सरकार का कारवाई करत नाही? असा खडा सवाल विचारतानाच सरकारचा काही धाक वगैरे उरला आहे की नाही? असं म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य शासनावर टीका केली. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर त्या प्रश्नाला उत्तर न देता राज ठाकरे निघून गेले.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. शहरातील पाषाण भागात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत बाबू वागसकर, किशोर शिंदे, वसंत मोरे उपस्थित होते.

    राज्यातील दुकाने तसेच अस्थापने यांनी मराठी पाट्या लावाव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यासाठी २५ नोव्हेंबर ही डेडलाइन देखील दिलेली होती. आता ही मुदत संपल्याने मनसे आक्रमक झाली आहे. याविषयी राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही सरकार त्याची अंमलबजावणी होईल, अशी पावले का उचलत नाही. सारखं आपलं बाळासाहेबांचे विचार-बाळासाहेबांचे विचार म्हणायचं, मग त्यांचे विचार अंमलात का आणत नाही? मशिदींवरचे भोंगे काढायला सांगितले होते, ते ही सरकारला काढता आले नाहीत. जे कुणी मराठी पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी”

    नोटीस नाही तर आता थेट कारवाई, दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार
    जर सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही संबंधित लोक ऐकत नसतील तर सरकारचा धाक आहे की नाही? न्यायालयाची भीती वाटते की नाही? असं तर असेल तर आपण अराजकतेकडे चाललोय, असं राज ठाकरे म्हणाले. त्याचवेळी ड्रग्जमधूनन मिळणाऱ्या पैशावरच सगळ्यांचं चाललंय की काय? त्यामुळेच कारवाई होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

    सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीनंतरही बहुतांश दुकानांवर मराठी पाट्या नाहीत, BMCने घेतला मोठा निर्णय
    मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील प्रश्न विचारला असता उत्तर न देताच राज ठाकरे निघून गेले. सरकारने आरक्षणाचा शब्द पाळला नाही तर ख्रिसमस दरम्यान मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यावर ते काय सांताक्लॉज आहेत काय? अशी खिल्ली राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात उडवली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed