पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या ६ ई ६७८९ या इंडिगो विमानातून प्रवास करणाऱ्या सुब्रत पटनाईक यांना खिडकीजवळील क्रमांक १० ए या आसनाची गादी गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने या आसनाचे छायाचित्र ‘एक्स’वर पोस्ट करून, ‘इंडिगो’ कंपनीच्या सेवेवर टीका केली. नफा कमवण्याचा हा सर्वोत्तम उपाय असल्याची टिप्पणीही या प्रवाशाने केली. त्यानंतर अन्य सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही ‘इंडिगो’वर टीका करण्याची संधी सोडली नाही. ‘कदाचित ही केवळ ट्रायल असेल. लवकरच इंडिगो कंपनी गादीसह आसनासाठी अडीचशे ते ५०० रुपये आकारेल,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली.
सोशल मीडियावरून टीका होत असताना अखेर ‘इंडिगो’ कंपनीला जाग आली. त्यांनी ‘एक्स’वर प्रतिसाद देऊन सुब्रत पटनाईक यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. ‘आसनावरून गादी निखळली असून, लवकरच आमचे विमान कर्मचारी ते आसन ठीक करतील,’ असे सांगण्यात आले. तसेच, ‘ही गादी व्यवस्थित आहे की नाही, याबाबतही तुम्ही तुमचा अभिप्राय संबंधित कर्मचाऱ्यांना कळवा,’ अशी विनंतीही कंपनीने त्यांना केली. भविष्यातही तुम्हाला चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हे लिहिण्यासही ते विसरले नाहीत.
‘इंडिगो’च्या वाईट सेवेबाबत याआधीही अनेकांनी तक्रार केली आहे. सन २०२२मध्ये अभिनेता राणा डुग्गुबाटी याने सामान सापडत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अभिनेत्री पूजा हेगडेने ‘इंडिगो’चे कर्मचारी उद्धट असल्याचे म्हटले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात ‘इंडिगो’ने एका विशेष मुलाला रांचीतून प्रवास करण्यास परवानगी न दिल्याने हवाई वाहतूक महासंचालनालयाने ‘इंडिगो’ला पाच लाखांचा दंड ठोठावला होता.
Read Latest Maharashtra news And Marathi News