• Mon. Nov 25th, 2024
    राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत

    पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे १७ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान केले आहे.
    शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अवकाळीग्रस्त जिल्ह्यांचे तातडीने पंचनामे करा: मुख्यमंत्री शिंदे
    अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मागील दोन दिवस पाऊस झाला. त्यामध्ये सुमारे सतरा जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, डाळिंब, टॉमेटो ही पिके जमीनदोस्त झाली. गारपिटीमुळे नुकसानीची तीव्रता वाढली असून नाशिक, नगर आणि नंदुरबार जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि टॉमेटो पिकांना फटका बसला आहे. तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने संत्रा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

    बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना नैसर्गिक संकटाचा तडाखा बसला. नाशिक जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टर पिकांचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान केले आहे. नगर जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. या दोन्ही जिल्ह्यात द्राक्षासारख्या व्यापारी पिकांना मोठा फटका बसल्याचे निदर्शनास येत आहे.

    ठाकरे शिवसैनिकांना मदत करत नाहीत; गंभीर आरोप करत नारायण राणेंचा हल्लाबोल

    पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर, धुळे जिल्ह्यात जवळपास साडेचार हजार तर नंदुरबार जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ठाणे, पालघर, जळगाव, सातारा, जालना, संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील पिकांनाही नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed