मिळालेल्या माहितीनुसार, कास पठारच्या दुर्गम भागात असलेल्या सातारा तालुक्यातील जुंगटी येथील संतोष लक्ष्मण कोकरे (४८) आणि शंकर दादू जानकर (५२) हे दोघे कारगाव येथे आपल्या आत्याकडे पाहुणे निघाले होते. कात्रेवाडी हद्दीत जंगलातून जात असताना दोन अस्वलांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संतोष कोकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या चवताळलेल्या अस्वलाने कोकरे यांच्या शरीराचे मोठे मोठे लचके तोडले. तर शंकर जानकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अस्वलांनी हल्ला केल्याने कास परिसरात खळबळ उडाली आहे.
यावेळी जानकर यांनी हल्ल्याचा प्रतिकार करायला सुरुवात केल्यानंतर एक अस्वल जंगलात पळून गेले. मात्र दुसऱ्या अस्वलाने संतोष कोकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांना खाली पाडून त्यांच्या डोक्याला, मांडीला, हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले. या अस्वलाला हुसकावून लावून या दोघांनी नातेवाईकांशी संपर्क केला. कास पठार कार्यकारी समितीच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना समितीच्या वाहनातून सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती समजल्यानंतर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन या जखमींची विचारपूस केली.
यावेळी वैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्याशी त्यांनी चर्चा करून तातडीने योग्य ते उपचार करून दक्षता घेण्याची सूचना केली. यावेळी जखमींचे नातेवाईक उपस्थित होते. तसेच वनविभागाला आदेश देऊन जखमींना मदत करण्याची सूचनाही केली. घटनेचा पंचनामा करून अश्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने मदत करावी. त्यात कोणताही हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना त्यांनी वनविभागाला दिल्या आहेत.