• Sat. Sep 21st, 2024
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; जादुटोण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडलं, तब्बल ७८ लाखांचा गंडा

नवी मुंबई: तंत्रमंत्र, जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच, पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून ४२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच, ३६ लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात या अधिकाऱ्याच्या पत्नीला पॅरेलिसिसचा झटका आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दारू तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवली; मात्र एका चुकीनं डाव फसला, पोलिसही चक्रावले
वाशी पोलिसांनी या प्रकरणातील भोंदूबाबा व त्याचे सहकारी अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील ६२ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून सध्या ते ५६ वर्षीय पत्नीसह वाशीमध्ये राहतात. तक्रारदार हे त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी दुसऱ्या शहरात जाऊन येऊन होते. या कालावधीत त्यांची पत्नी वाशी येथील घरामध्ये एकटीच राहात होती. याचाच फायदा उचलत आरोपी नीलेश हातवळणे उर्फ गुरुजी या भोंदू बाबाने आणि त्याची पत्नी अर्चना हातवळणे, सागर जेजुरकर, विजय बाबेल, नाना भाऊ, भक्ती, आणि अनुसया कांबळे या सर्वांनी पत्नीला काळ्या जादूची भीती दाखवून पूजा अर्चा करण्याच्या बहाण्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले.

तसेच तिच्याकडून ४२ लाख ८ हजार रुपये किमतीचे १०५.२ तोळे सोन्याचे दागिने तसेच, ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम लुबाडली. गेल्या महिन्यात पत्नीला पॅरेलिसिस झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी घरात काळी बाहुली, हळद कुंकू, सुया टोचलेले लिंबू दिसून आले. घरातील एका वहीमध्ये पत्नीने मंत्र जादूटोणाबाबतची माहिती आणि मागील आठ-नऊ महिन्यांचा रोजचा दिनक्रम लिहून ठेवला होता. त्यात आरोपी नीलेश (गुरुजी) आणि त्याचे अन्य सहकाऱ्यांनी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचे नमूद केले होते.

शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याने रडवलं; जिनिंग-प्रेसिंग उद्योग धोक्यात, तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ

या प्रकारानंतर पवार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वाशी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात फसवणुकीसह, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. आपले बिंग फुटू नये यासाठी नीलेश आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराच्या घरी तसेच रुग्णालयात जाऊन घरात सापडलेल्या वहीची मागणी करून दमदाटी केली. तसेच, रुग्णालयात जाऊन त्यांच्या पत्नीची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या मुलीने आणि जावयाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता नीलेश याने त्यांना शिवीगाळ करून त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed