• Sat. Sep 21st, 2024

वर्दीतले देवमाणूस! एसपींसमोर दुचाकीचा अपघात; तरुण ट्रकखाली, तात्काळ मदतीमुळे दोन जीव वाचले

वर्दीतले देवमाणूस! एसपींसमोर दुचाकीचा अपघात; तरुण ट्रकखाली, तात्काळ मदतीमुळे दोन जीव वाचले

सातारा : कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवत संबंधित दुचाकीस्वारांना ट्रकखालून बाहेर काढून त्यांचा जीव वाचला. हा अपघात शेंद्रे (ता. सातारा) गावच्या हद्दीत आज, शनिवारी दुपारच्या सुमारास झाला.

याबाबत माहिती अशी, महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आटोपून पोलीस अधीक्षक समीर शेख हे साताऱ्याकडे यायला निघाले. शेंद्रे (ता. सातारा) गावच्या हद्दीतील पिराच्या दर्गाजवळ ते आले असता त्यांच्यासमोरच दुचाकीवरील दोघेजण अचानक ट्रकखाली घसरून पडले. यावेळी अधीक्षक शेख यांनी तातडीने गाडीतून खाली उतरून स्वत: मदत करण्यास सुरुवात केली. ट्रकखाली अडकलेल्या दोघा तरुणांना त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या जवान अंकुश यादव, संजय कांबळे, प्रल्हाद ढाकरे, आकाश निकम, शंकर गायकवाड यांच्या मदतीने ओढून बाहेर काढले.

ब्रम्हदेव जरी आला तरी…, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य, शहाजीबापूंचं टेन्शन वाढलं

खुद्द पोलिस अधीक्षकच अपघातग्रस्तांना मदत करत असल्याचे पाहून इतर काही जण मदतीसाठी धावून आले. अधीक्षक शेख यांनी जखमींची चौकशी केली असता ते सांगोला व बारामतीमधील असल्याची माहिती मिळाली. रोहित साहेबराव बिले (वय २३, रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर), ओंकार दादासो गार्डी (२३, रा. बारामती, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांना ट्रकखालून काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रितीसंगमावर, पुण्यतिथीनिमित्त यशंवतराव चव्हाणांना अभिवादन

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed