• Mon. Nov 25th, 2024

    पवित्र रक्तदानाचे नको ते इव्हेंट; भाजपच्या नेत्यांची केली रक्ततुला, वायरल व्हिडिओमुळे नाराजी

    पवित्र रक्तदानाचे नको ते इव्हेंट; भाजपच्या नेत्यांची केली रक्ततुला, वायरल व्हिडिओमुळे नाराजी

    चंद्रपूर: रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. करोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर गाव पातळीवर सुद्धा रक्तदान शिबिरे घेतली जातात. मात्र या पवित्र रक्तदान शिबिरातील एक विडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.भाजपाच्या एका नेत्यांची रक्तदान शिबिरात कार्यकर्त्यांनी रक्ततुला केली.देवराव भोंगळे असे या नेत्याचे नाव आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ते जवळचे म्हणून ओळखले जातात.

    रक्ततुलासाठी रक्ताच्या पिशव्या डोनेट ब्लड बँक मध्येच ठेवल्या गेल्या होत्या. ज्यांनी रक्तदान केले त्यांचे हे दान या प्रकरणामुळे वाया जाणार नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.कार्यकर्त्यांनी हा प्रकार केवळ प्रेमातून केला हे खरे मात्र याची खरच गरज होती काय ? हा खरा प्रश्न आहे.

    भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्ह्यातील राजुरा शहरात करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या शिबिरात मोठा तराजू आणून एका बाजुला नेत्याला व दुसऱ्या बाजुला एका बॉक्समध्ये रक्ताच्या पिशव्या ठेवून रक्ततुला केली.वजन कमी भरल्यान बॉक्सच्या वरती रक्ताच्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. हा प्रकार जिल्ह्यातील राजुरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे घडला. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमात वायरल झाल्याने पवित्र रक्तदानाचे अशा प्रकारे इव्हेंट नको होते अशी टीका केली जात आहे.

    राजुरा विधानसभेतील आमदारकी मिळवण्यासाठी देवराव भोंगळे प्रयत्नात आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकू येतेय. गावागावात, शहरात त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. विविध कार्यक्रमाच्या त्यांनी सपाटा लावला आहे. मात्र वायरल झालेल्या व्हिडिओमुळे भोंगळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed