मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषदेतून त्यांच्यावर कडाडून टीका करणारे छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक फैरी झडतायेत. काल-परवापर्यंत वैचारिक असलेला संघर्ष आता वैयक्तिक उणीदुणी काढण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. हीच बाब अधोरेखित करत सुषमा अंधारे यांनी जरांगे पाटलांना फटकारलं आहे.
मागास म्हणायचं आणि १०० जेसीबीमधून फुलांची उधळण करायची
एकीकडे आम्ही मागास आहे असं सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं. आर्थिक मागास असल्याचं सांगायचं आणि त्याचवेळी १०० जेसीबीमधून फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची, हे कुठेतरी विरोधाभासी असल्याचं सांगत जरांगेच्या भूमिकांवर अंधारे यांनी प्रहार केलाय.
आरक्षणाची कोंडी केंद्र सरकारच फोडू शकतं
मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमचीही भूमिका आहे. पण ही भूमिका घेत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पण हा तिढा फक्त केंद्र सरकारच सोडवू शकतं किंबहुना मराठा आरक्षण मुद्द्याची कोंडी तिथेच फुटू शकते. मराठा आरक्षणासंबंधीचा विधिमंडळाने एक ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवावा. आणि त्यानंतर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
अपयश झाकण्यासाठी भाजप आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणू पाहतंय
त्याचवेळी भाजप महिला सुरक्षा, आरोग्यव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, कंत्राटी भर्ती, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थितीवरून लक्ष हटविण्यासाठी फक्त आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणू पाहत आहे. भाजपाला आरक्षण द्यायचं नाही. फक्त जाती-जातींमध्ये भांडण लावायचं आहे, असा आरोपही अंधारे यांनी केला.