आज, शुक्रवारपासून तुलसीविवाहारंभ होत आहे. त्यामुळे चातुर्मास समाप्तीनंतर विवाह मुहूर्त सुरू होत असून, २७ नोव्हेंबरपासून विवाहांना प्रारंभ होणार आहे. यंदा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलदरम्यान मुबलक विवाह तिथी आहेत. मात्र, मे आणि जूनदरम्यान गुरू आणि शुक्राचा एकत्रित अस्त असल्याने सुट्टीचा योग साधून लग्नाचा बार उडविण्याच्या अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाणार आहे. यंदा मे महिन्यात एक आणि दोन, तर जून महिन्यात २९ आणि ३० हे चारच विवाह मुहूर्त आहेत. जुलैतही सहा मुहूर्त उपलब्ध आहेत.
लग्नतिथी तुलसीविवाहानंतरच…
भगवान विष्णू हे विवाहाची देवता मानले जातात. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीदरम्यान भगवान विष्णू चार महिने निद्रावस्थेत असल्याची मान्यता हिंदू धर्मात आहे. त्यामुळे यादरम्यान शुभ कार्य आणि विवाह सोहळे केले जात नसल्याने दाते पंचांगानुसार तुलसीविवाहानंतरच विवाह मुहूर्त असल्याची माहिती नितीन मोडक यांनी दिली.
बाजारपेठेतही लगबग
विवाहांना चार दिवसांनंतर सुरुवात होणार असल्याने बाजारपेठेतही दिवाळीनंतर पुन्हा चैतन्य अवतरले आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून नाशिककर वधू-वरांच्या कपड्यांसह इतर खरेदीसाठी शहरात येत आहेत. महिन्यापर्यंत मुहूर्त असल्याने व्यावसायिकांसाठी हा लग्नसराईचा मोसम ‘लाभदायक’ ठरणार आहे. याचबरोबर मंगल कार्यालये, केटरर्स, डेकोरेशन आदींचीही लगबग बघायला मिळत आहे.
महिनानिहाय विवाह मुहूर्त… (दाते पंचांगानुसार)
नोव्हेंबर- २७, २८, २९
डिसेंबर- ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१
जानेवारी- २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१
फेब्रुवारी- १, २, ४, ६, १२, १३, १७, २४, २६, २७, २८, २९
मार्च- ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०
एप्रिल- १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८
मे- १, २
जून- २९, ३०
जुलै- ९, ११, १२, १३, १४, १५