रेल्वेवर विशेष लक्ष
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही देशाची वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते. या गाडीवर पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष आहे. या गाडीची वेळ तंतोतंत पाळली जावी, अशा सूचना आहेत. या गाडीसाठी दुसऱ्या गाड्या बाजूला थांबवून ‘वंदे भारत’ला पुढे मार्ग दिला जातो. दुसऱ्या गाड्या बाजूला ठेवल्यामुळे त्यांच्याही वेळापत्रकावर परिणाम होते. तरीही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरून ‘वंदे भारत’ला उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये काही तांत्रिक कारणांबरोबरच इतरही काही कारणांचा समावेश आहे. या गाडीला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ‘वंदे भारत’ला होणारा उशीर होण्याचा वेळ दोन मिनिटांपासून ते एक तासांपर्यंत आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ‘वंदे भारत’ला उशीर होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
‘जुन्या एक्स्प्रेसच बऱ्या’
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला इतर ‘एक्सप्रेस’ गाड्यांपेक्षा तिकीटदर देखील जास्त आहे. मात्र, इतर गाड्यांना लागणारा वेळ आणि ‘वंदे भारत’चा वेग एकच असल्याचे दिसत आहे. त्यात आता या गाडीला अधून-मधून उशीर होत असल्यामुळे प्रवाशांकडून आपली जुनीच एक्सप्रेस बरी, असा सूर लावला जात आहे.
इतर दिवशी वेळेअगोदर
मुंबई-सोलापूर आणि सोलापूर-पुणे या दोन ‘वंदे भारत’ महिन्यातून २६ दिवस चालतात. या ‘वंदे भारत’ला पुण्यात येण्यास काही दिवस उशीर होत असला महिन्यात १५ दिवस ती वेळेअगोदर दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. कधी-कधी पुण्यात येण्यास दोन ते पाच मिनिटांचा उशीर झाला तरी पुणे विभागातून हा उशीर भरून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.
‘मुंबई-सोलापूर’ पुण्यात येण्यास झालेला विलंब
ऑगस्ट – ५,
सप्टेंबर – ४
ऑक्टोबर – १०
‘सोलापूर-मुंबई’ पुण्यात येण्यास झालेला विलंब
ऑगस्ट – ७
सप्टेंबर – ७
ऑक्टोबर – १०
‘वंदे भारत’ वेळापत्रकानुसार धावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. गेल्या तीन महिन्यात वंदे भारतचे वेळापत्रक ९० टक्के पेक्षा जास्त वेळा पाळले गेले आहे. काही तांत्रिक कारणामुळे ‘वंदे भारत’ला खूपच कमी वेळा उशीर झाला होता. उशीर होण्याचा वेळदेखील पाच ते सात मिनिटांचा असतो.- डॉ. रामदास भिसे, वाणिज्य व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग