• Sat. Sep 21st, 2024

मराठा आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारनेच छगन भुजबळांना पुढे केलंय का? मनोज जरांगेंचा थेट सवाल

मराठा आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारनेच छगन भुजबळांना पुढे केलंय का? मनोज जरांगेंचा थेट सवाल

ठाणे: राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली पेटू नयेत, यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. दिवस पुरत नाही म्हणून रात्रीही सभा आणि कार्यक्रम घेऊन लोकांशी संवाद साधत आहोत. मात्र, हे सरकार आमच्यावरच गुन्हे ठोकत आहे. दुसरीकडे छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण होणारी वक्तव्यं करत आहेत. त्यांच्यावर कोणताही कारवाई होत नाही. मात्र, आमच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीच छगन भुजबळ यांना पुढं घातलंय, असा घ्यायचा का? सरकारच छगन भुजबळांना पाठबळ देत आहे का? या माध्यमातून सरकारलाच जातीय दंगली भडकवयाच्या आहेत का, असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. ते मंगळवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, ते (भुजबळ) म्हणतात की, मला वाचता येत नाही, मराठा आरक्षणाचा अभ्यास करावा लागेल. मी अभ्यास केला असेल किंवा नसेल पण लढून आरक्षण मिळवले आहे. आम्ही कसंही आंदोलन करु, पण आम्हाला आरक्षण हवे आहे. मला वाचायला किंवा अभ्यास करायला वेळ नाही. आता छगन भुजबळ यांनीच तुरुंगात गेल्यावर वाचत बसावं किंवा पिक्चरची स्टोरी लिहीत बसावे, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. आपण मराठा आरक्षणाची लढाई ७५ टक्के जिंकली आहे. आता फक्त २४ डिसेंबरला मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्याची वाट पाहा. तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

जरांगेंच्या सभांना रात्रीही परवानगी मिळते, भुजबळांच्या वक्तव्यानंतर पोलिसांकडून धाराशिवमध्ये आयोजकांवर गुन्हा

राज्य सरकारने आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही किंवा थांबणार नाही. मराठ्यांच्या लेकरांच्या कल्याणासाठी आम्ही असे कितीही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत. एकीकडे आम्ही मराठा-ओबीसी तेढ निर्माण होऊ नये म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. पण छगन भुजबळ चिथावणीखोर वक्तव्यं करुन रोष पसरवत आहेत, दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सरकार काहीही करत नाही. याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा का, सरकारने त्यांना ठरवून पुढे घातलंय. तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचे नाही, त्यामुळे जाणुनबुजून गुन्हे दाखल केले जात आहेत का? राज्यभरात मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. त्यामुळे सरकारला आता मराठ्यांना काहीही करुन ओबीसी प्रवर्गात घ्यावेच लागणार आहे. मग सरकार वळवळ करणाऱ्यांना का थांबवत नाही? एकच माणूस विरोध करतोय म्हणून तुम्ही ६ कोटींच्या मराठा समाजाला वेठीस धरू शकत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Pune News: जालन्याचे माजी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यात बदली; मनोज जरांगे संतापले

भुजबळ एकटे पडलेत, मनोज जरांगेंचा दावा

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये, यासाठी छगन भुजबळ राज्यभरात जितके अधिक कार्यक्रम घेतील, तेवढा आमचा फायदाच होईल. आतापर्यंत सर्व मराठा समाज एकवटला नव्हता. मात्र, छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमांमुळे उरलेला मराठा समाजही एकत्र आला आहे. छगन भुजबळ यांच्यापासून अर्ध्या ओबीसी नेत्यांना फारकत घेतली आहे. एवढ्या वर्षांचा प्रशासकीय अनुभव असलेला नेता असा कसा वागू शकतो. त्यापेक्षा मी रानात काम करणारा बरा, कोणाच्याच हाताला लागत नाही. सध्या मराठ्यांची त्सुनामी आली आहे. या लाटेच्या तडाख्यात कोणी सापडला तर त्याची सुट्टी नाही. छगन भुजबळ यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले की, हे मराठे आता ओबीसी आरक्षणात आले. आता एकच पर्याय शिल्लक राहिला आहे. तो म्हणजे भडकाऊ भाषण देऊन जातीयवाद पेटवणे. तेच काम सध्या छगन भुजबळ करत आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

स्वागतामुळे कधी रात्री तर कधी भल्या पहाटेच सभा, पुण्यातील सभेतला सूत्रसंचालकही म्हणाला, तुम्ही सगळे नशीबवान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed