मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेचा वाद टोकाला पोहोचल्याने शिंदे गटाच्या राजन किणे यांनी या ठिकाणी शाखेच्या पुनर्बांधणीचे काम होईपर्यंत कंटेनर शाखा रस्त्याच्या कडेला सुरू केली आहे. या वादात पालिका प्रशासनाने चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. या कंटेनर शाखेवर पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसताना शिवाईनगर येथील मुख्य चौकात टीएमटी बस थांब्याशेजारीच शिंदे गटाने ९ नोव्हेंबर रोजी नवीन शाखेचे उद्घाटन केले. पदपथावरच आठ फूट रुंद व चौदा फूट लांब ही शाखा असल्याने पादचाऱ्यांना अशा शाखांचा त्रास होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाने या विरोधात भूमिका मांडल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
याआधीही ठाण्यात रस्ता रुंदीकरणानंतर कळवा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर पालिका प्रशासनाने कारवाई केली असता, याठिकाणी कंटेनरमध्ये शाखा सुरू आहे. याबाबत ठाणे पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, शिवाईनगर येथील शाखा नेमकी कोणाच्या परवानगीने याठिकाणी बसवली, त्याची माहिती घेतली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आवश्यक त्या ठिकाणी ‘कंटेनर शाखा’ उपलब्धही करून दिल्या जातील
शिवसेना शाखांवरून दोन्ही गटांत होणारे वाद टाळण्यासाठी ही सामंजस्याची भूमिका आमच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ज्या शिवाईनगर येथील मूळ शिवसेना शाखेवरून वाद झाला, ती शाखाही दोन वेळा पालिकेच्या कारवाईत जमीनदोस्त झाल्यानंतर आम्हीच बांधली होती. मात्र भविष्यात अशा पद्धतीने शिवसैनिकांची ज्या ठिकाणी मागणी असेल, त्या ठिकाणी ‘कंटेनर शाखा’ उपलब्धही करून दिल्या जातील. या शाखेचे कोणतेही पक्के बांधकाम केलेले नसून आवश्यकतेनुसार ते इतर ठिकाणी स्थलांतरित करता येईल – प्रताप सरनाईक, शिवसेना आमदार (शिंदे गट)
वर्तकनगर पोलिसांना निवेदन दिलंय
शिवाईनगर येथील शिवसेनेच्या ३० वर्षे जुन्या शाखेबाबत शिंदे गटाने नाहक वाद उकरून काढल्यानंतर पोलिसांनी ६ मार्च २०२३ रोजी टाळे ठोकले. आता समोरील गटाने त्यांची वेगळी चूल मांडत ‘कंटेनर शाखा’ सुरू केल्यास याप्रश्नी स्थानिक वर्तकनगर पोलिसांना निवेदन देत शिवाईनगर येथील शिवसेनेच्या मूळ शाखेचे टाळे काढण्यासाठी निवेदन आमच्याकडून दिले जात आहे. त्याला विरोध झाल्यास उग्र आंदोलन केले जाईल – भास्कर बैरीशेट्टी, उपशहरप्रमुख, ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्र (ठाकरे गट)