• Mon. Nov 25th, 2024
    ‘हिंदूराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा, पण हृदयात खोट असेल त्याला हिंदूराष्ट्रात जागा नसेल’

    पुणे : ‘सनातन भारतीय संस्कृती व हिंदू एकता दृढ करण्यासाठी आम्ही ‘दरबार’ भरवतो. त्यावर कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी दरबारात येऊन म्हणणे मांडावे. आमने-सामने करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या, पण कारणे सांगू नका,’ अशा शब्दांत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उलटे आव्हान दिले. ‘राजकारण्यांनी जनतेला ‘बाबा’ मानले, तरच निवडणुका जिंकता येतील,’ असेही त्यांनी आपल्या भक्त राजकारण्यांना सुनावले. त्याचवेळी ‘भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत सव्वाशे वेळा दुरुस्त्या झाल्या असून, एकदा हिंदूराष्ट्र निर्मितीसाठीही दुरुस्ती केली पाहिजे,’ अशी भूमिका बागेश्वर धाम सरकार यांनी मांडली.

    जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे संगमवाडी येथे बागेश्वर धाम सरकार यांच्या तीन दिवसीय ‘हनुमान सत्संग कथा’ व ‘दिव्य दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. फाउंडेशनचे जगदीश मुळीक व योगेश मुळीक उपस्थित होते. ‘बागेश्वर धाम सरकार यांचे दावे घटनाविरोधी, अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. त्यावर ‘आम्ही सनातन हिंदू संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरबार भरवतो. मी कधीही रावणाशी फोनवर बोललेलो नाही. विनोदाच्या माध्यमातून भाविकांना संस्कृती समजावून सांगण्याचा प्रयत्न होता. मंत्रविज्ञान व मंत्रचिकित्सेचा पुरस्कार करत असलो, तरी रुग्णालयांना माझा विरोध नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांचे आक्षेप असतील, तर त्यांनी दरबारात येऊन मांडावे. माझ्यावर परमेश्वराची कृपा असल्याने मी स्पष्ट बोलतो, त्यासाठी बहाणे सांगू नका,’ असे प्रत्युत्तर बागेश्वर धाम सरकार यांनी दिले.

    आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली: मनोज जरांगे पाटील
    ‘त्या’ वक्तव्याबद्दल दिलगिरी

    या वेळी बागेश्वर धाम सरकार यांनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘संत तुकाराम हे परमेश्वरासमान असून, त्यांच्याप्रति माझी अपार निष्ठा आहे. मी एका पुस्तकातील लेखावर बुंदेलखंडी लहेजातून बोलत असताना ते वक्तव्य केले होते. त्यामुळे कोणाच्या श्रद्धेवर आघात झाला असल्यास दिलगीर आहे. पुणे दौऱ्यात वेळ मिळाल्यास देहूला जाऊन संत तुकाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेईन,’ असे ते म्हणाले.

    बाबांनी चमत्कार सिद्ध करावा, आम्ही चळवळ बंद करू ‘अंनिस’चे पत्रकार परिषदेत आव्हान
    ‘हिंदूराष्ट्रा’साठी घटनेत दुरुस्ती करा

    ‘भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत सव्वाशे वेळा दुरुस्त्या झाल्या असून, एकदा हिंदूराष्ट्र निर्मितीसाठीही दुरुस्ती केली पाहिजे,’ अशी भूमिका बागेश्वर धाम सरकार यांनी मांडली. ‘हिंदूराष्ट्र किंवा रामराज्यात अल्पसंख्यांकांना कोठेही जाण्याची गरज नाही. तेथे सामाजिक समरसता, समानता व धर्मांतर्गत कर्माला महत्त्व असेल. मात्र, एखाद्याच्या हृदयात खोट असेल, तर त्याला हिंदूराष्ट्रात जागा नसेल,’ असेही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed