• Mon. Nov 25th, 2024

    छान खेळलात मित्रांनो, चलता हैं! वर्ल्ड कप गेल्यानंतर नागपूरकर चाहत्यांचा एकमेकांना धीर

    छान खेळलात मित्रांनो, चलता हैं! वर्ल्ड कप गेल्यानंतर नागपूरकर चाहत्यांचा एकमेकांना धीर

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरू होता. एकेक करून भारतीय फलंदाज बाद होत होता. धावा कमी झाल्या. गोलंदाजांकडून आशा होती. तसेच काहीतरी चमत्कार होईल अन् भारताच्या बाजूने विजय येईल, अशी आशा नागपुरातीलही चाहत्यांना होती. ४० चेंडूंत २ धावा अशी स्थिती आली अन् चाहत्यांची आशा मावळली. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला. सलग दहा सामने जिंकून अंतिम सामन्यात धडक देणाऱ्या भारतीय संघाचे कौतुकही होते आणि नेमक्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याचे दु:खही शहर अनुभवत होते. ‘खूब खेले दोस्तो, हार-जीत चलती हैं’, असे म्हणत चाहते एकमेकांना धीर देत होते.

    -भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान रविवारी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी नागपूरकरांनी जय्यत तयारी केली होती.

    -विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ढोल-ताशे, फटाके, ध्वनियंत्रणा, तिरंगी ध्वज, टॅटूचीही सोय करण्यात आली होती.

    -आपण अंतिम लढत जिंकणारच हा उत्साह प्रत्येक नागपूरकरांमध्ये होता.

    -विजयानंतर तिरंगे घेऊन बाहेर पडण्याचे नियोजनही करण्यात आले होते. लक्ष्मीभुवन चौकात चाहते जमले होते. मात्र, पराजय झाल्याने या सर्व उत्साहावर विरजण पडले.

    -सामना सुरू झाला तेव्हा सुरुवात चांगली होती. रोहित शर्मा, शुभमन गिल जोडीने दमदार फटकेबाजी केली. आधी शुभमन बाद झाला. नंतर रोहित शर्मा ४७ धावांवर तंबूत परतला. चाहते काहीसे खट्टू झाले होते. मात्र, आशा कायम होती.

    -पराजयामुळे हिरमोड झाला असला तरी आपला संघ चांगला खेळला, अशा प्रतिक्रियाही नागपूरकर क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त होत होत्या.

    -अंतिम सामन्याचा रोमांच अनुभवण्यासाठी नागपूरकरांमध्ये जबरदस्त उत्साह होता. हा महामुकाबला मोठ्या पडद्यावर पाहता यावा, यासाठी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व राजकीय नेतेमंडळींनी विशेष व्यवस्था केली होती.

    -हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही मोठे पडदे लावण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर भारतीय संघाच्या विजयासाठी देवाकडेही साकडे घालण्यात आले होते.

    -स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक नेत्यांनी आपापल्या जनसंपर्क कार्यालयांत अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण आयोजित करून क्रिकेटप्रेमी मतदारांना निमंत्रित केले होते.

    -भारताने विश्वचषक जिंकावा, यासाठी काहींनी तर रॅली काढली होती. मंदिरात पूजन करून महाआरती करण्यात आली होती. काहींनी ताजुद्दिनबाबांच्या दर्ग्यात चादर चढवली होती.

    -भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत स्पर्धेत एकही लढत गमावली नव्हती. अंतिम लढत गाठता आली नाही. मात्र, आपला संघ कुठेच कमी पडला नाही, अखेरपर्यंत तो लढला, अशा शब्दांत नागपूरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
    २ वर्षांपासून वर्ल्डकपची तयारी, कुणी कधी खेळायचं याचंही प्लॅनिंग, जबाबदारीही ठरलेली, रोहित शर्मा काय काय म्हणाला?
    पुढील सामन्यांसाठी शुभेच्छाही

    क्रिकेट विश्वचषकात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत मात करीत अंतिम फेरीत प्रवेश करताच उपराजधानीतील क्रिकेट शौकिनांनी शहरात विविध ठिकाणी आतषबाजी करीत यानिमित्ताने दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली होती. यापेक्षाही मोठी दिवाळी साजरी करण्याचे नियोजन नागपूरकरांनी केले होते. दुपारपासून सर्वत्र सामना बघणाऱ्यांची लगबग दिसून आली. चौकाचौकांतील पानटपऱ्यांवर सामना बघण्यासाठी गर्दी जमली होती. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करत २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाला मोठे लक्ष्य देता आले नाही, याची खंत क्रिकेटप्रेमींमध्ये होती. हा खेळ आहे, असे म्हणत क्रिकेटप्रेमींनी पुढील सामन्यांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

    फटाके तुळशीच्या लग्नात फोडू!

    भारताचा विजय निश्चितच आहे, असा विश्वास नागपूरकर चाहत्यांना होता. त्यासाठी दिवाळीचे सांभाळून ठेवलेले फटाके बाहेर निघाले होते. मात्र, पराभव झाल्याने ते चाहत्यांनी पुन्हा घरात ठेवले. ‘हे फटाके आता तुळशीच्या लग्नात फोडू’, असे या चाहत्यांनी बोलून दाखविले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *