गेल्या आठवड्याच्या अखेरीपासून हॉटेल, बेकरी यांना गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवायला लागला असून इंडक्शन, कोळशावरील चुली, लाकडाचा वापर सुरू झालेला आहे. कोळसा, लाकूड, बायोमास इंधन यासाठी अजूनही अधिकृत परवानगी मिळालेली नसल्याने हा प्रश्न मार्गी केव्हा लागणार असा प्रश्न आहे. त्यातच इंडक्शन आणि कोळशाच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्याने अन्न शिजवण्याचा पर्याय काय आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोळशाचा वापर वाढला, तर उन्हाळ्यातही प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार काय उपाययोजना करते, याकडे लक्ष लागले आहे.हॉटेले ‘व्यावसायिक’ या श्रेणीत असल्याने हॉटेल चालक-मालकांना सिलिंडरसाठी कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे जसा सिलिंडर मिळतो, जशी इंधन उपलब्धता होते, तशी हॉटेले चालू-बंद राहत आहेत. एखादे हॉटेल सकाळी बंद असते, तर दुपारपर्यंत इंधन व्यवस्था झाल्यावर संध्याकाळी सुरू झालेले असते. अशा प्रकारे किमान २० ते २५ टक्के हॉटेले चालू-बंद होत सुरू असल्याचे इंडियन हॉटेल आणि रेस्तराँ असोसिएशन (आहार) तर्फे सांगण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हॉटेल व्यावसायिकांना तात्पुरत्या तत्त्वावर इतर इंधन वापरण्यासाठी परवानगी दिली, तरी याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारतर्फे अजून आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या प्रतीक्षेशिवाय हातात काहीच नाही अशी माहिती ‘आहार’चे सरचिटणीस सुनील शेट्टी यांनी दिली. कोळशाच्या किमती १०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. तर गेल्या सोमवारी बारा हजारांना मिळणारा इंडक्शन आज ६० हजारांपर्यंत पोहोचला आहे. आगाऊ पैसे देऊनही इंडक्शन उपलब्ध होत नाही अशीही परिस्थिती बाजारात दिसते, असेही ते म्हणाले.या परिस्थितीत डोसा, इडलीपासून तळलेल्या पदार्थांपर्यंत मेन्यूमध्ये कपात करण्यात आली आहे. पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खायला घालण्यासाठीही इंधन नसल्याने अडचण येत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता पर्यायी इंधनाचा वापर झाला तर त्यासाठी कारवाई होऊ नये, अशीही विनंती हॉटेल व्यावसायिक करत आहेत.
विक्रेत्यांकडे प्रतिदिन मोठ्या संख्येने इंडक्शनची मागणी होत आहे आणि विक्रेत्यांकडे एवढ्या प्रमाणात इंडक्शन नाही, असेही दिसते. काही ठिकाणी लहान शेगड्या, चुली यांचाही वापर सुरू झालेला आहे. कुठे लाकूडही वापरले जात आहे.
मुंबईमध्ये शनिवारी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक समाधानकारक दिसत होता. पण उन्हाळ्यातही हवेत प्रदूषके साचल्याने मुंबईत धुरक्याचे वातावरण मार्च महिन्यातही मुंबईकरांनी अनुभवले होते. त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर झाल्यास मुंबईच्या प्रदूषण पातळीवर कोणती उपाययोजना केली जाणार, याचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी शनिवारी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करून प्रतिक्रिया मिळाली नाही.