मिळालेल्या माहितीनुसार, नागा हरिनारायण यादव (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अमर लोटन सिंग आणि लोटन सिंग असे फरार असलेल्या बापलेकांची नावे आहेत. मेनका राधाकृष्ण रवानी (२२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मृतक मेनकाशी फरार आरोपी अमरचे अनैतिक संबध होते. मात्र मृतक खालच्या जातीची असल्याने त्यांच्या या संबंधाला अमरचा बाप मुख्य आरोपी लोटन सिंगचा विरोध होता. त्यातच आरोपी अमर आणि मृतक महिलेसोबत काही कारणावरून वाद होत होते. त्यामुळे आरोपी अमरने या महिलेचा पिच्छा सोडविण्यासाठी त्याने आरोपी बापाला साथ दिली.
अटक आरोपी नागा याला सोबतीला घेऊन या तिघांनी खुनाचा कट रचला होता. त्यानंतर २५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास मृत मेनकाला आरोपी अमरने बहाण्याने कल्याण पूर्वेतील पिसवली गावात बोलवून घेतले. तर अटक आरोपी नागा आणि मुख्य आरोपी बाप हे दोघेही आदीच ठरल्याप्रमाणे घाटनस्थळी दबा बसले होते. दरम्यान संध्याकाळनंतर अंधार पडताच मृतक महिलेला आरोपी अमर अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या फनिक्युलर रोपवेच्या लगत असलेल्या झुडपात तिला घेऊन गेला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून तिच्याच परकरच्या नाडीने तिचा गळा आवळून खून केला. घटनास्थळावरुन तिघेही फरार झाले.
दरम्यान खून झाल्यानंतर दोन दिवसांनी एका अज्ञात महिलेचा मृतदेह हाजीमलंग गडाच्या फनिक्युलर रोपवेच्या लगत असलेल्या झाडाझुडपात आढळून आल्याची माहिती हिललाईन पोलीस पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत महिलेचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर २७ ऑक्टोंबर रोजी अनोळखी महिलेचा खून अज्ञात आरोपीने केल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.
खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि डमडाटा काढून मृत महिलेची ओळख पटविण्यात आली. तसेच घटनास्थळावर तिन संशयित आरोपींची संशयितरित्या हालचाल करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर त्यांची तांत्रिक आणि गुप्तरित्या माहिती काढली असता आरोपी मोबाईल बंद करून बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यात पळून गेल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर बिहार राज्यातील जिल्हा बक्सर येथील पोलीस पथक दाखल होऊन बक्सर जिल्ह्यातील आरवली गावात सापळा रचून नागा हरीनारायण यादव यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता मेनकाच्या हत्येचा कट रचून खून केल्याचा घटनाक्रमाची माहिती दिल्याने हा धक्क्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी नागा यादवला अटक करून ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने हिललाईन पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनि आनंद रावराणे यांनी दिली आहे. तसेच अटक आरोपीला हिललाईन पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील बाप लेक असलेले दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.