या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जात असून, स्ट्रॉबेरी लागवडीच्या पूर्वतयारीसाठी विविध भागातील परीक्षण करण्यात येत आहे. याशिवाय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना भात पिकानंतर स्ट्रॉबेरीची लागवड करता येणार आहे. त्याला यश मिळाल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबून गावातच रोजगार निर्मिती होणार आहे. त्याला पर्यटनाची जोड मिळाल्यास या परिसराचा विकास होण्यास मदत मिळणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये स्ट्रॉबेरी पिकाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी स्ट्रॉबेरी पिकाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विभागाकडून सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह आदिवासी समाजातील नेते, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पन्नास हजार रुपये अनुदान
‘कृषी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाकडे स्ट्रॉबेरी लागवडीबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार असून, प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याला स्ट्रॉबेरी लागवडीसाठी पन्नास हजार रुपये प्राथमिक अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे,’ असेही आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले.
भीमाशंकर परिसरात महाबळेश्वर सारखेच हवामान असल्याने स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाला चांगला वाव आहे. त्यामुळे आहुपे परिसरातील पंधरा ते वीस गावांमधील तीनशे शेतकऱ्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, त्यांना महाबळेश्वर येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या माध्यमातून भीमाशंकर येथे स्ट्रॉबेरीचे क्लस्टर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– संजय काचोळे, पुणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी