जेलरोडच्या शिवानी कनकुटे (वय २३) या महिलेला प्रसूतीसाठी दहा तारीख दिलेली होती. पहिलीच प्रसूती असल्याने ती घाबरलेली होती. खासगी कंपनीत कामाला असलेले पती हरिष कनकुटे यांच्यासमवेत ही महिला गुरुवारी सकाळी बिटको रुग्णालयात आली. तिची वैद्यकीय तपासणी करून अॅडमिशन पेपर तयार करण्यात आला. मात्र, प्रसूतीबाबतची गुंतागुतींची कारणे दाखवत तिच्यासह अन्य महिलांना नाशिकपासून तीस किलोमीटर दूरवरील एसएमबीटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. या कारणांमध्ये बिटकोतील पाणीटंचाई हे प्रमुख कारण होते.
माजी नगरसेवक जगदीश पवार यांच्याशी या दाम्पत्याची योगायोगाने भेट झाली. पवार यांनी या दोघांना वरिष्ठ डॉक्टरांकडे पाठवले. या डॉक्टरांनी महिलेला दाखल करून घेण्याचे आदेश कनिष्ठ डॉक्टरांना दिले. मात्र, या डॉक्टरांकडे परत गेल्यावर महिलेला पाणीटंचाई व प्रसूतीसंबंधित इतर कारणे दाखवत एसएमबीटीमध्ये जाण्याचा सल्ला दिल्ला. वरिष्ठ डॉक्टरांना पाणीटंचाईची माहिती मिळताच त्यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला.
मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्या स्वतः पायी तेथे गेल्या आणि टँकरची गरज सांगितली. तेथील अधिकाऱ्यांनी उद्यान विभागाचे तीन टॅँकर पाठवले. ते पाणी रुग्णालयाच्या टाकीत सोडण्यात आले. संबंधित दाम्पत्य जगदीश पवारांना पुन्हा भेटले. धोका न पत्करता एसएमबीटीमध्ये जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पवारांनी बिटकोची शाश्वती देत या जोडप्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहिलीच प्रसूती असल्याने ती दुपारी तीनच्या सुमारास एसएमबीटीत दाखल झाली.
बिटकोत समस्यांचा पाढा
बिटकोमध्ये त्वचा रोगतज्ज्ञ नाही. दंतरोग तज्ज्ञ दिवसाआड येतो. कान, नाक, घसा तज्ज्ञ फक्त गुरुवारी येतात. गुरुवारी हा तज्ज्ञ न आल्याने रुग्णांचे, खास करून दिव्यांगांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्यांचे हाल झाले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बिटकोत आलेल्यांना महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात पाठवले जाते. तीन वर्षांपासून बिटकोत रेडिओलाजिस्ट नसल्याने सोनोग्राफी मशिन बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. बिटकोत खासगी कृष्णा लॅब आणि शासनाची महालॅब असूनही अचूक व वेळेत रिपोर्ट येत नाहीत.
प्रशासन उदासीन
महिलेचे पती हरिष कनकुटे ‘मटा’शी बोलताना म्हणाले की, ‘पत्नीची दोन दिवसांनी प्रसूतीची तारीख आहे. रक्ताच्या पिशव्या लागतील. पाणीटंचाई आहे अशी कारणे आम्हाला देण्यात आली. पाण्याचा टँकर येईलच तेव्हा दाखल करून घेऊ, नाही तर तुमचे तुम्ही बघा, असे डॉक्टरांनी सांगितले. बिटकोत कोणी जबाबदारीच घ्यायला तयार नाही. त्यामुळे पत्नीला नाईलाजाने एसएमबीटीमध्ये नेले.
मंत्री, महापालिका आयुक्तांना अनेक वर्षांपासून निवेदने देऊनही बिटकोच्या समस्या सुटत नाहीत. पाणीटंचाई, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी टंचाई, अस्वच्छता आदी समस्या कायम आहेत. लिफ्टही अधेमधे बंद असते – जगदीश पवार, माजी नगरसेवक
बिटकोतील बेसमेंटचे नळ चोरीस गेले होते. तसेच एक-दोन पाइप लिकेज होते. प्लम्बरला बोलावून तातडीने दुरुस्ती केली. खबरदारी म्हणून दोन टँकर तातडीने बोलावले. पाण्याच्या टाकीची वॉटरबॉलची लेवल झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. सिझरची यादी पूर्ण करून शस्त्रक्रिया केल्या. कामात अडथळा आला नाही. एखादा पेशंट स्वतःहून अन्यत्र गेला असेल – डॉ. शिल्पा काळे, बिटको इनचार्ज
Read Latest Maharashtra News And Marathi News