शहराच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल महिन्याला १० ते १२ लाख रुपये येते. वीज वितरणचा दर महिन्याला बील भरण्याचा तगादा आणि पुरवठा खंडित करण्याची नामुश्की टाळण्यासाठी प्रशासनाने देवस्थानकडे एका योजनेचे वीज देयक भरावे, अशी मागणी मागच्या वर्षी केली होती. त्याची अंमलबजावणी काही महिन्यांपासून सुरू झाली आहे. यासाठी प्रतिमाह सरासरी सहा ते सात लाख रुपये दिले जात आहेत.
ब्रिटीश काळात सन १८५४ मध्ये तीर्थक्षेत्र म्हणून नगर परिषदेची स्थापना भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेली त्र्यंबक नगर परिषद उत्पन्नाचे नवनवे मार्ग अवलंबत आहे. मालमत्ता कराची रचना करताना ०.०४ ऐवजी ०.४ टक्के आकारणी करण्यात आली. झालेली चूक लक्षात येवून देखील ती सुधारली नाही. मालमत्ता धारकांना याचा नाहक भुर्दंड बसतो आहे. यातून जवळपास सव्वा दोन कोटी रुपयांची वसुली आहे. त्यात बाजार वसुली आणि धर्मशाळांसह अन्य उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. शासन दरसाल सव्वा कोटी रुपयांचे यात्राकर अनुदान देत आहे. भाविकांच्या वाहनांना प्रवेश कर व वाहनतळ शुल्क असे एकाच वाहनाकडून दोन वेळा पैसे घेतले जातात. वाहन प्रवेशाचा ठेका ९० लाख रुपये आणि वाहनतळाचा ठेका ४३ लाख रुपये प्रतिवर्षाप्रमाणे दिला जातो.
ठेकेदारावर उधळपट्टी
जमा आणि खर्च यांचा ताळमेळ नगरपरिषदेकडे राहिलेला नाही. शहर सफाईचा ठेकेदार वर्षाला तब्बल दोन कोटींच्या आसपास बील घेत आहे. ठेकेदारावर केलेल्या मेहरबानीची किंमत नागरिकांना चुकती करावी लागत आहे. समाधानकारक सेवा मिळणे दुरापस्त झाले आहे. शहरातील ठराविक प्रमुख रस्ते स्वच्छ होतात; मात्र वाहनतळासह सर्वत्र कचरा साठलेला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट भाविकांच्या दानधर्मातून मिळालेल्या पैशातून नगर पालिकेच्या उधळपट्टी कारभाराला ठिगळ लावण्याचेच काम करत आहे. पालिका प्रशासन भाविकांच्या सेवासुविधेसाठी काळजी काळजी वाहताना दिसत नाही. स्वच्छता, पिण्याचे पाणी, पथदीप यासह मुलभूत सुविधा शहरातून बेदखल झाल्याची स्थिती आहे.
मालमत्ता मूल्यांकनाच्या ०.४ टक्के कर आकारणी
वसुली दोन कोटी २० लाख
शहर स्वच्छतेचा ठेका एक कोटी ८० लाख
बाजार वसुली २० लाख मात्र, बाजारपेठ नाही
भाविकांच्या वाहनांना प्रवेश कर आणि वाहनतळ शुल्क असे दोन कर
वाहनतळावर स्वच्छतेचा अभाव