मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रशासकीय बैठक पार पडली. या बैठकीला जरांगे यांच्या वतीने अंतरवाली आणि अंबड येथील पाच जणांचे शिष्टमंडळ व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. त्यात रवींद्र बनसोड, डॉ. रमेश तारख, अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारख यांच्यासह इतर दोघांचा समावेश होता.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाने प्रक्रियेबाबत सकारात्मकता दाखवली असून व्यापक स्तरावर छाननी करण्याचा निर्णय झाला आहे. मोडी लिपी अभ्यासकांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील मराठा कुणबी, कुणबी मराठा यांचा समावेश कोणत्या आधारावर करायचा यावरही चर्चा झाली. आता गाव नमुना ३३ आणि ३४ तपासण्यात येत आहे, अशी माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली. या बैठकीला प्रत्येक विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव उपस्थित होते. ‘आमचा सरकारवर विश्वास आहे. मराठा आरक्षणासाठी सगळे पक्ष एकत्र आले आहेत. प्रशासकीय बैठकीत आपल्याला फारसे कळत नाही. समाजाचे कल्याण व्हावे एवढीच इच्छा आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाला सहभागी होण्यास सांगितले’, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, आमदार रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी दुपारी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पवार यांनी जरांगे यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला. सध्या जरांगे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची रिघ लागली आहे.