• Mon. Nov 25th, 2024

    ४८ रुपये किलोची साखर २० रुपयांत; बोपेगाव ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय, अट फक्त एकच…

    ४८ रुपये किलोची साखर २० रुपयांत; बोपेगाव ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय, अट फक्त एकच…

    म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी : ग्रामपंचायतीचे कर नियमितपणे भरणाऱ्या सर्व ग्रामस्थांना दिवाळी अवघ्या वीस रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय बोपेगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे नियमित करदात्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार आहे. सरपंच वसंतराव कावळे यांनी ही माहिती दिली.

    शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीकडून लागणाऱ्या कागदपत्रांसाठी थकबाकी भरण्याची अट अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ठेवली जाते. त्यामुळे शक्यतो शासकीय काम अडले तरच किंवा निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांशिवाय कोणी ग्रामपंचायत कर भरण्याकडे लक्ष देत नाही. मात्र, नागरिकांनी कर भरावा यासाठी बोपेगाव ग्रामपंचायतीने वेगळीच शक्कल लढवली आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासनाने नियमित कर भरणा करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दिवाळीनिमित्त २० प्रतिकिलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामपंचायतीची थकीत करवसुली होण्यासाठी हातभार लागणार असून, नियमित करभरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच कावळे, उपसरपंच योगेश कावळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कावळे आदींनी केले आहे.
    कोण होणार कारभारी? पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, ४९ ठिकाणी बिनविरोध सरपंच
    अशी मिळणार साखर
    वार्षिक कर – २० रुपये दराने मिळणारी साखर

    ५०० रुपये – पाच किलो
    १००० रुपये – दहा किलो
    २००० रुपये – १५ किलो
    २००० हून अधिक – २० किलो

    सर्वच ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असून, त्याशिवाय गावाचा विकास होणे अवघड आहे. त्यासाठी नागरिकांनी नियमित कर भरण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला.- वसंतराव कावळे, सरपंच

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *