• Sat. Sep 21st, 2024

खबरदार! खाद्यपदार्थात भेसळ कराल तर…; पुण्यात FDAची आजपासून विशेष मोहीम

खबरदार! खाद्यपदार्थात भेसळ कराल तर…; पुण्यात FDAची आजपासून विशेष मोहीम

म. टा. प्रतिनिधी, पुणे : अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्याचे काम करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) अपुरे मनुष्यबळ असल्याची स्थिती आहे. परिणामी अन्न पदार्थांची तपासणी आणि कारवाई करताना मर्यादा येत असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्याच्या ‘एफडीए’कडे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ४३ जागा मंजूर आहेत. मात्र, विभागामध्ये सद्यस्थितीत १४ अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावरच ‘एफडीए’चा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या कमी असली तरी त्याचा कारवाई किंवा तपासणीवर कोणताही परिणाम होत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असते. पुणे जिल्ह्यात सोमवारपासून (६ नोव्हेंबर) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दिवाळीत मिठाई, खवा, मावा, तूप, तेल या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे या काळात भेसळ आणि कमी दर्जाच्या अन्न पदार्थांची विक्री होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या काळात अन्न पदार्थांच्या नमुन्याचे संकलन करून त्याची तपासणी केली जाते; तसेच गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नियमीतपणे तपासणी आणि कारवाई सुरू असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात ३१ लाखांचा साठा जप्त

गणेशोत्सवाच्या काळात अन्न पदार्थांची तपासणी करण्यासाठी ‘एफडीए’ने जिल्ह्यातील ३०८ नमुने संकलित केले होते. त्यापैकी १४४ आस्थापनांना सुधारणा करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती, तर या काळात ३१ लाख दोन हजार ४७ रुपयांच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
छत्तीसगडमधील २९ जागांवरील निकाल ठरणार निर्णायक, आदिवासी समाज कॉंग्रेसला सोडून भाजपची साथ देणार?
या पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ

सणासुदीच्या काळात दूध, गायीचे तूप, तेल, खवा, बटर, मिठाई, मावा या अन्न पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे या अन्न पदार्थांची विक्री होणाऱ्या सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी…

– नोंदणी व परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावी.
– मिठाई, दूध, दुग्धजन्यपदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावेत.
– खरेदी करताना ‘यूज बाय डेट’ पाहूनच खरेदी करावी.
– उघड्यावरील; तसेच फेरीवाल्याकडून मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये.
– माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे.
– मिठाईची साठवूणक योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) करावी.
– बंगाली मिठाईचे ८ ते १० तासांच्या आत सेवन करावे.
– मिठाईवर बुरशी असल्यास सेवन करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed