• Mon. Nov 25th, 2024

    विवाहित महिलेस दिलेले लग्नाचे वचन आमिष नाही; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा

    विवाहित महिलेस दिलेले लग्नाचे वचन आमिष नाही; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘विवाहित महिलेला दिलेले लग्नाचे वचन म्हणजे आमिष नाही,’ असे निरीक्षण नोंदवून जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून आरोपी तरुणाला दिलासा दिला. तरुणाने महिलेला लग्नाबाबत विचारले होते; पण त्यानंतर महिलेने शारीरिक संबंधांसाठी आग्रह केल्याचे प्रथमदर्शी दिसून येते, असे सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी आदेशात नमूद केले आहे.

    महिलेला नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायला सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केला आणि लग्नास नकार देणाऱ्याविरोधात संबंधित महिलेच्या तक्रारीवरून चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

    प्रकरण काय?

    या प्रकरणातील आरोपीची अणि महिलेची २०२१मध्ये एका टेलिग्राम चॅनेलमध्ये ओळख झाली होती. काही दिवसांनी महिला त्या टेलिग्राम चॅनेलमधून बाहेर पडली. आरोपीने महिलेच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर मेसेज करून ‘तू ग्रुप का सोडलास,’ अशी विचारणा केली. त्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत बोलायला लागले. काही दिवसांच्या संवादानंतर ‘तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे,’ असे आरोपी म्हणाला. ‘माझे लग्न झाले आहे. मला तीन मुले आहेत,’ असे महिलेने त्याला सांगितले. मात्र, महिला २०२२मध्ये हिंजवडी येथील कंपनीत नोकरी करू लागली, तेव्हा आरोपीने तिला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. लग्नाच्या आमिषाने वारंवार तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

    सर्व काही घडले महिलेच्या सहमतीने

    या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. नीलेश वाघमोडे, अॅड. चंद्रसेन कुमकर आणि अॅड. महेश देशमुख यांनी काम पाहिले. या प्रकरणात आरोपीने लग्न करण्याबाबत कोणतेही वचन दिले नव्हते. संबंधित महिला तिच्या नवऱ्यापासून चार वर्षे अगोदरच विभक्त राहत होती. ती आरोपीच्या फ्लॅटवर स्वतःहून येत होती. ती आरोपीपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. दोघांमध्ये सहमतीने संबंध आले होते, असे आरोपीकडे असलेले फोटो अणि महिलेच्या एका पत्राद्वारे सिद्ध होत असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. फोटो आणि ते पत्रही न्यायालयात सादर केले.
    गर्भातील कळ्या खुलेना! नाशिकमध्ये ५ वर्षांपासून मुलींच्या जन्मदरात घट, चिंताजनक आकडेवारी समोर
    तरुणाच्या सांगण्यावरून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला आणि वारंवार शारीरिक अत्याचार करून लग्नास नकार दिला, अशी महिलेची तक्रार होती. मात्र, महिला आणि तिचा पती घटनेच्या आधीपासूनच विभक्त राहत होते. त्यांच्यात घडलेल्या सर्व गोष्टी महिलेच्या संमतीने घडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.- अॅड. नीलेश वाघमोडे, आरोपीचे वकील

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed