म. टा. वृत्तसेवा, चांदवड: तालुक्यात मागील वर्षीची अतिवृष्टी, गारपीट आणि चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत असलेल्या संतोष निवृत्ती ठोके (वय ४०, रा. खेलदरी) या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घराजवळील जनावरांच्या गोठ्यात गेले अन्…
घराजवळील जनावरांच्या गोठ्यात गेले अन्…
ठोके यांचे खेलदरी येथे पाच एकर क्षेत्र आहे. त्यांनी शेतीसाठी खेलदरी विविध कार्यकारी सोसायटी व पिंपळगाव बसवंत येथील एका सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाले, तर चालूवर्षी कोरडा दुष्काळ पडल्याने शेतात पीकच घेता आले नाही. यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत ते असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी घराजवळील जनावरांच्या गोठ्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ठोके यांच्यावर कर्ज आहे किंवा नाही यांचा पंचनामा महसूल विभागाचे धोडांबे मंडळ अधिकारी राज पाटील, तलाठी विशाखा गोसावी यांनी केला. ठोके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.