प्रत्येकाला निदान या वर्षी तरी गावातील कामे पूर्ण होतील असे वाटले होते. मात्र, झाले भलतेच सरपंच झालेल्या महिला सरपंच निवडणूक विभागाकडे निवडणूक खर्च दाखल करायचंच विसरल्या आणि हीच मोठी चूक त्यांना भोवली आहे. या महिला सरपंचाला सरपंच पदावरून हटवलं आहे. तसे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. चित्रा कुऱ्हे यांना सरपंच होऊन चार वर्षे झाले होते.
सरपंच पद मिळाल्यानंतर निवडणूक विभागाकडे डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांनी खर्चाचा तपशील दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गावचा विकास करण्यासाठी परदेशातून गावाकडे आलेल्या उच्चशिक्षित महिलेला एका चुकीच्या कारणाने सरपंच पद गमवावे लागले असून या घटनेमुळे पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
डॉ. चित्रा कुऱ्हे ह्या गावचा विकास करण्यासाठी स्विडन येथून खेडेगावात परतल्या होत्या. निवडणूक विभागाच्या नियमांचे पालन न केल्याने त्यांना आपले सरपंच पद गमवावे लागले आहे. हिंगोलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार त्यांनी निवडणूक विभागाकडे निवडणुकीच्या खर्चाचा तपशील दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. चित्रा कुऱ्हे ह्या विदेशात स्थायिक झाल्या होत्या. मात्र, त्यांची मातृभूमी सोबत जुळलेली नाळ यामुळे त्यांनी आपल्या गावाकडे गावचा विकास हवा या दृष्टीने त्या राजकारणात उतरल्या. त्यात त्यांना मोठे यश देखील मिळालं. मात्र, या कारवाईमुळे त्यांचं पद रिक्त झालं आहे.