• Sat. Sep 21st, 2024

त्यावेळी अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का संतापले होते? म्हणाले होते, ‘मी तुला धडा शिकवेन!’

त्यावेळी अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का संतापले होते? म्हणाले होते, ‘मी तुला धडा शिकवेन!’

मुंबई: भारताचा सर्वात वलयांकित गुप्तहेर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या अजित डोवाल यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. त्यांनी भारतासाठी हेर म्हणून केलेल्या कामगिरीच्या अनेक खमंग कहाण्या बऱ्याचदा ऐकवल्या जातात. त्यामुळे दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापाठोपाठ अजित डोवाल यांचा अप्रत्यक्ष दरारा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, याच अजित डोवाल यांच्याशी खूप वर्षांपूर्वी मीरा बोरवणकर यांनी खमकेपणाने ठाम भूमिका घेतली होती. त्यावेळीही अजित डोवाल हे दिल्लीच्या वर्तुळातील बडे प्रस्थ होते. परंतु, मीरा बोरवणकर यांनी कर्तव्याच्या आड येणाऱ्या अजित डोवाल यांनाही ठामपणे खडे बोल सुनावले होते. मीरा बोरवणकर यांनी नुकत्याच ‘मटा ऑनलाईनला’ दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

मीरा बोरवणकर यांनी मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत असताना आलेल्या अनुभवांविषयी मुलाखतीत सविस्तरपणे सांगितले. यावेळी त्यांनी अजित डोवाल यांच्याबाबत घडलेला एक किस्सा सांगितला. मीरा बोरवणकर यांनी म्हटले की, ‘आम्ही मुंबई गुन्हे शाखेत असताना इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स करायचो. त्यावेळी मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमक्या येत असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही हे फोन कॉल ट्रेस केले तेव्हा ते कोलकाता येथून येत असल्याचे समजले. आम्ही धमकी देणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी ‘प्रोजक्ट एक्स’ ही मोहीम हाती घेतली.’

बिल्डरच्या घशात जागा घालण्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग, राज्यात अनेक उदाहरणे, बोरवणकर यांचा गंभीर आरोप

‘नंतरच्या काळात धमक्या देणारे आरोपी दिल्लीमध्ये आल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या फोन कॉलवरील दोन आरोपींचा आवाज ओळखला. यापैकी एकजण छोटा राजन टोळीचा विकी मल्होत्रा, तर दुसरी व्यक्ती फरीद तनाशा असल्याचे अधिकाऱ्यांनी मला सांगितले. मात्र, या दोघांसोबत संभाषणात आणखी एक व्यक्ती होती. हे दोघेजण त्या व्यक्तीला ‘सर’ म्हणायचे. पण तो आवाज कोणाचा होता, हे आम्हाला तेव्हा कळू शकले नव्हते. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला गेले. तेथून एका पोलीस इन्स्पेक्टरने मला फोन केला. त्याने मला सांगितले की, विकी मल्होत्रा एका व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये बसला आहे. आम्ही हॉटेलबाहेर आल्यानंतर दोघांना पकडू, असे अधिकाऱ्याने मला सांगितले. मी त्याला होकार दिला. त्यानंतर विकी मल्होत्रा त्या व्यक्तीसोबत हॉटेलमधून बाहेर पडला आणि गाडीने निघाला.’

अजितदादांच्या त्या प्रकरणाचे पडसाद, बोरवणकर यांचं तिकीट कॅन्सल, मटा कॅफेत पहिल्यांदाच गौप्यस्फोट

‘त्यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने आपली गाडी मध्ये टाकून दोघांना अडवले. मुंबई पोलिसांना बघताच विकी मल्होत्राला समजले की, आपला खेळ संपला. पण त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने इन्स्पेक्टरला सांगितले की, तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लाव. थोडाफार वाद घातल्यानंतर पाटील नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरने फोन करुन त्या व्यक्तीला माझ्याशी बोलायला दिले. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने मला सांगितले की, मी इंटेलिजन्स ब्युरोचा माजी संचालक आहे. तुम्ही विकी मल्होत्राला सोडा, असेही त्यांनी सांगितले. पण छोटा राजन टोळीच्या गुंडासोबत इतका मोठा अधिकारी कसा काय असू शकतो, हा प्रश्न मला पडला. त्यामुळे मी समोरच्या व्यक्तीला त्याची बॅच विचारली. त्यानंतर मी समोरच्या व्यक्तीला त्याच्या महाराष्ट्रातील बॅचमेटची नावं विचारली, तीदेखील त्याने बरोबर सांगितली. तेव्हा मला हा व्यक्ती वरिष्ठ अधिकारी आहे, हा विश्वास बसला. मात्र, त्याच्या सांगण्यावरुन विकी मल्होत्रासारख्या कुख्यात गुंडाला सोडून देणे मला पटले नाही. त्यामुळे मी विकी मल्होत्राला सोडण्यास नकार दिला. त्यावर समोरच्या व्यक्तीने मला म्हटले की, ‘मी तुला धडा शिकवेन’. मलाही त्यांचे बोलणे ऐकून राग आला. मी पण त्यांना म्हणाले की, मीदेखील तुम्हाला धडा शिकवेन. माझ्या या पवित्र्यामुळे अजित डोवाल थोडेफार धास्तावले. त्यांनी दिल्ली पोलिसांना फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले. परंतु, तोपर्यंत ही बातमी मीडियाला समजली होती. अजित डोवाल हे छोटा राजन टोळीच्या गुंडासोबत सापडले, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले. त्यानंतर असं पसरवण्यात आलं की, अजित डोवाल साहेब एक ऑपरेशन करणार होते. पण मुंबई पोलिसांनी दाऊदच्या सांगण्यावरुन हे ऑपरेशन उधळून लावलं. पण आम्हाला काहीच माहिती नव्हते’, असे मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed