• Thu. Nov 28th, 2024

    मिठाई दुकानांवर नजर, ‘एफडीए’ची आजपासून मोहीम; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तैनात

    मिठाई दुकानांवर नजर, ‘एफडीए’ची आजपासून मोहीम; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तैनात

    नाशिक : गुजरातमधून येणारी बर्फी रोखण्यासाठी व नाशिककरांना चांगल्या प्रकारचे शुद्ध अन्न मिळावे यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) वतीने आज, बुधवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सुरुवातीला मिठाई विक्रेत्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यानंतरही विक्रेत्यांनी कायद्याचे पालन केले नाही तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरासह जिल्ह्यातील मिठाई, खवा मावा, खाद्यतेल, वनस्पती तूप व सणासुदीचे अन्नपदार्थांचे विक्रेते यांच्या मालाची तपसणी केली जाणार आहे. यात उत्पादक, रिपॅकर व घाऊक विक्रेते यांचाही समावेश असेल.

    दिवाळीत मिठाई आणि नमकीन या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ज्या प्रमाणात मागणी असते त्या प्रमाणात कच्च्या मालाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे काही विक्रेते अयोग्य मार्ग अवलंबून मालात भेसळ करतात. गेल्या काही दिवसांपासून मिठाईच्या पदार्थांमध्ये गुजराथी बर्फीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईमध्ये द्वारका परिसरात एका ट्रॅव्हलच्या बसमध्ये बर्फीचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याचप्रमाणे दिंडोरी रोडवर देखील एका खासगी वाहनात बर्फीचा साठा आढळला होता. ही बर्फी खाण्यास घातक असून ती गुजरातमार्गे नाशिकला येत असते. नाशिकच्या अनेक मोठमोठ्या मिठाइच्या दुकांनामध्येही तिचा सर्रास वापर सुरू असल्याने विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. याबाबत काही नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाला तक्रारी केल्या असून ही कारवाई होणार आहे. यासाठी विभागनिहाय अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तयार केली असून त्यांच्यामार्फत तपासणी केली जाणार आहे.

    सणासुदीच्या काळात भेसळ होण्याचा संभव असतो. त्यासाठी विभाग, जिल्हा, शहर पातळीवर सूक्ष्म नियोजन केले आहे. तपासणीच्या माध्यमातून एकही दुकान सुटणार नाही अशी तजवीज करण्यात आली आहे. दोषींवर तातडीने कारवाई करण्यात येईल व माल नष्ट केली जाईल.

    – संजय नारागुडे, सहा आयुक्त (अन्न), नाशिक विभाग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed